Breaking News

माजी मंत्री डॉ.पंतगराव कदम यांना विधानपरिषदेत आदरांजली


माजी मंत्री तथा विधानसभा सदस्य डॉ.पंतगराव कदम यांना विधानपरिषदेत आज आदरांजली वाहण्यात आली. डॉ. कदम यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव विधानपरिषदेत सभागृह नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला होता. हा प्रस्ताव संमत करुन डॉ. कदम यांना आदरांजली वाहण्यात आली.

शोक प्रस्तावावर बोलताना सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. सर्व सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. त्यांचे शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान आहे. ते गोरगरीबांचे कैवारी होते. त्यांनी पंढरपूर येथे वारकरी भवन बांधले. माणसांना माणसाशी जोडणारे व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे.

महसूल मंत्री श्री. पाटील यावेळी बोलताना म्हणाले, डॉ. पतंगराव कदम हे सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी अनेक विभागाचे मंत्रिपद भूषविले. प्रत्येक खात्याचे मंत्री म्हणून केलेले त्यांचे काम उल्लेखनीय आहे. त्यांनी प्रत्येक विभागाला न्याय दिला. त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी भारतीय विद्यापीठाची स्थापना केली. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे विश्व निर्माण केले. देश-विदेशातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. डॉ. कदम हे अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांची कारकीर्द स्मरणात राहणारी आहे.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यावेळी म्हणाले, डॉ.पतंगराव कदम हे त्यांच्या मनाप्रमाणे जीवन जगले. खोटा आव त्यांनी कधीही आणला नाही. जमिनीवर पाय ठेवून ते सर्वांशी समरस व्हायचे. मला ते नेहमी प्रेरणा देत असत. त्यांचे अचानक जाणे धक्कादायक आहे.

या शोक प्रस्तावावर परिवहनमंत्री दिवाकर रावते, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विधानपरिषद सदस्य सर्वश्री भाई जगताप, रामहरी रुपनवर, आनंदराव पाटील, जोगेंद्र कवाडे, निरंजन डावखरे,बाळाराम पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करुन डॉ. कदम यांना आदरांजली वाहिली