Breaking News

भटक्या-विमुक्तांच्या राजस्तरीय चिंतनपरिषदेचे आयोजन

पाथर्डी/विशेष प्रतिनिधी - पाथर्डी तालुक्यातील, भटक्यांची पंढरी म्हणून ख्यातनाम असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथे, भटक्या-विमुक्तांच्या राजस्तरीय चिंतनपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याकामी संयोजन समितीचे धुरीण प्रा.किसन चव्हाण, अरुण जाधव, बंडू शिंदे यांनी पत्रकार परिषदघेऊन परिषदेविषयी माहिती दिली. रविवारी 01 एप्रिल रोजी बहुजनांचे नेते अ‍ॅड.विजय मोरे यांच्या शुभहस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून, यावेळी लक्ष्मण गायकवाड, नामदेव माळी, मच्छिंद्र भोसले, मोतीराज राठोड, मानवेंद्र वैदू, गुलाब वाघमोडे, भरत विटकर, नामदेव जाधव,  विलास माने, बाळासाहेब काळे, वामन महापुरे, शारदा खोमणे, ज्ञानेश्‍वर जाधव, महेंद्र रोकडे, शांताराम पंदेरे आदि मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. दुपारच्या सत्रात भोजनानंतर भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा उपराकार, पद्मश्री लक्ष्मण माने यांचे भटक्या-विमुक्त समाजाची सध्याची सामाजिक, राजकीय परिस्थिती व पुढील वाटचाल या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान होऊन राज्यातून आलेल्या निवडक कार्यकर्त्यांची मनोगते होणार आहेत. दुपारी 4 .30 ते 5.30 या तिसर्‍या सत्रात भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम पार पडणार असून, संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या भटक्या-विमुक्तांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करुन निर्णायक भूमिका विशद करणार आहेत. आजवर या विस्थापित समाजाने, जगण्यासाठी फक्त आंदोलने केली. परंतु आता प्रस्थापितांशी राजकीय संघर्ष करुन स्वतः प्रस्थापित होण्यासाठी राजकारणात महत्वाची भूमिका पार पाडण्याचा संकल्प केल्याची माहिती प्रा.किसनराव चव्हाण, अ‍ॅड.अरुण जाधव व बंडू शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रा.दिगंबर गाडे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोनटक्के, भगवान गायकवाड, बाळासाहेब आव्हाड, पप्पू बोर्डे, हुमायून आतार, दिपक साळवे, वसंत बोर्डे, सुभाष काळे, राजेंद्र काळे, आस्तान चव्हाण, शैला चव्हाण, मनिष उबाळे आदि प्रतिनिधी उपस्थित होते.