Breaking News

‘मालपाणी’मुळे परिवार आर्थिकदृष्टया सक्षम : आ. थोरात

संगमनेर ;कामगारांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना सातत्याने राबविणाऱ्या मालपाणी उद्योग समुहाने कामगार कल्याणास सातत्याने प्राधान्य दिले. येथे कामगार आणि व्यवस्थापन हातात हात घालून गुण्यागोविंदाने काम करताना दिसते आहे. मालपाणी समुहाने रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्याने हजारो परिवार आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत, असे गौरवोद्गार माजी महसूलमंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी काढले.येथील कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. माधव नेहे ५० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य तंबाखू कामगार महासंघ व मालपाणी उद्योग समुहाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यगौरव सोहळयात ते बोलत होते. मालपाणी इंडस्ट्रीयल पार्कमध्ये संपन्न झालेल्या या सोहळयाप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, मालपाणी उद्योग समुहाचे संचालक राजेश मालपाणी, अलका नेहे, संघटनेचे सरचिटणीस, विधिज्ञ ज्ञानदेव सहाणे, सचिन पलोड आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, कॉ. माधव नेहे हा माणूस एक यशस्वी कामगार नेता आहे. कारण त्यांनी कधीच आततायी भूमिका घेतली नाही. आक्रस्ताळेपणा केला नाही. उद्योग जगला तर कामगाराचा रोजगार जिवंत राहील, याचे त्यांनी नेहमी भान ठेवले. ३ हजार पेक्षाही अधिक परिवारांना मालपाणी उद्योग समूहामुळे रोजगार मिळतो. कामगारांना आपल्या परिवारातील घटक मानणारी भक्कम वैचारिक बैठक या समुहाला असल्याने कामगार आणि मालक यांच्यात छान सुसंवाद येथे पहावयास मिळतो. 

नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, कॉ. नेहे यांच्या समर्थ नेतृत्वाच्या यशाचे गमक परिपक्वता, सकारत्मकता आणि समंजसपणा यात आहे. राजेश मालपाणी म्हणाले, नेहे यांनी बजावलेली अर्धशतकी सेवा हा मालपाणी समुहातील विक्रम आहे. कॉ. सहाणे मास्तर आणि कॉ. नेहे या दोघांच्याही विचारी नेतृत्वामुळे गेल्या ३० वर्षांत या समुहात संप अथवा बंद आंदोलन झाले नाही. यावेळी आ. थोरात यांच्या हस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन उद्योग समूह व कामगारांच्यावतीने नेहे यांचा सपत्निक सन्मान करण्यात आला. सावरगावतळचे सरपंच राधाकिसन नेहे यांचेही यावेळी भाषण झाले. कॉ. नेहे यांच्या मानपत्राचे वाचन मुरारी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना शुक्ला आणि व्यवस्थापक रमेश घोलप यांनी केले.