Breaking News

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे सक्षमीकरण आणि दृढीकरण व्हावे : तांबे

संगमनेर प्रतिनिधी - शाळा व्यवस्थापन समिती ही प्रत्येक गावातील अत्यंत महत्त्वाची समिती आहे. त्यामुळे तिचे सक्षमीकरण झाले म्हणजे गावातील शाळेच्या गुणवत्ता वाढीला नक्कीच चालना मिळेल. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण होऊन गुणवत्तेचे दृढीकरण व्हावे, असे प्रतिपादन एन्. एस. यु. आय. चे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.

तालुक्यातील खांडेश्वर सांस्कृतिक भवन, खांडगाव येथे समिती सदस्यांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पं. स. च्या सभापती निशा कोकणे होत्या. याप्रसंगी थोरात कारखान्याचे सहसंचालक इंद्रजित थोरात, कृषी व पशुसंवर्धचे सभापती अजय फटांगरे, पं. स. उपसभापती नवनाथ अरगडे, जि. प. शिक्षण समिती सदस्य मिलिंद कानवडे, प्राचार्या अचला जडे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, जि. प. सदस्य रामहरी कातोरे, मिरा शेटे, सिताराम राऊत, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय कोकणे, पं. स. सदस्य शिवाजी रहाटळ, संतोष शेळके, अशोक सातपुते, सुनिता कानवडे, मधुकर गुंजाळ, रोहिणी गुंजाळ, सुनंदा भागवत आदींसह तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक सदस्य आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

जि. प. प्रा. शा. गि-हेवाडी शाळेच्या उत्कृष्ट लेझीम पथकाच्या संचलनाने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उभारण्यात आलेल्या शैक्षणिक स्टॉलचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

प्रारंभी गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी प्रास्ताविक केले. शिक्षकांच्या विविध कौशल्यांचे कसब आयोजित केलेल्या बाल आनंदमेळाव्यांतून विद्यार्थ्याच्या रूपाने आम्हाला पाहावयास मिळाल्याचे मनोगत इंद्रजित थोरात यांनी व्यक्त केले. पालक, विद्यार्थी, शिक्षक या तीन दुव्यांमध्ये असणारा समन्वयच मुलांच्या शैक्षणिक प्रगती साधण्यामध्ये उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन मिलिंद कानवडे यांनी केले. यावेळी नवनाथ अरगडे यांनीही मुलांच्या कलागुणांचे कौतुक करून धुमाळवाडी टॅबयुक्त शाळेतील शिक्षकांवर शाबासकीची थाप टाकली. तर सभापती निशा कोकणे यांनी अध्यक्षीय भाषणात ‘पालकांनी आपली मुले ही मराठी माध्यमाच्या शाळेतच घालावीत’, असे आवाहन केले.