Breaking News

तळोशी येथील सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू


नाशिक, दि. 10, मार्च - इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील सर्पमित्राचा विषारी सापाने दंश केल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकाश पांडुरंग गिते (वय 22) असे या सर्पमित्राचे नाव आहे.इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गिते गेल्या चार पाच वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करत होता. अनेक विषारी जातीचे साप पकडून ते जंगलात सोडले होते. गिरेवाडी येथे शेतात काम करत असताना एका नागास त्याने पकडले होते. यात चपळ नागाने आकाशच्या कानावर दंश केला होता. त्यानंतर काही वेळाने आकाशला भोवळ आली. त्यानंतर त्याच्या मित्रांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र साप अधिक विषारी असल्यामुळे आकाशची प्रकृती अधिक खालावल्याने त्यास नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे सांगितले.
त्यानुसार आकाशला नाशिक येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. त्यास नाशिक येथे दाखल करण्यात आले. तेव्हा वैद्यकीय अधिकार्‍यांनी आकाशला मृत घोषित केले. शव विच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.