Breaking News

बाप...!

किशोरावस्थेतून तारूण्य ओलांडून जेंव्हा प्रौढ म्हणजे आयुष्याची समज येते, आयुष्याचा अर्थ उमजू लागतो, आपण तेव्हा ज्याला आयुष्य मानत होतो त्यापेक्षा आयुष्याचे वास्तव वेगळे आहे, ध्येयपुर्तीसाठी आयुष्यात केलेल्या अनेक तडजोडींकडे अपरिहार्यतेच्या नजरेतून पाहिले की बापाने मुलांप्रती असलेल्या भावनिक कर्तव्यात केलेले दुर्लक्ष त्याग म्हणून स्वीकारण्याची समज आपोआप येते, मग आपल्या बापाचा तो त्याग बापाचे समाजात निर्माण झालेले स्थान, त्याने कमावलेली माणसं, समाजातील उपेक्षितांच्या दुःखांवर फुंकर घालण्यासाठी स्वतःच्या कुटुंबांचे सुख ओवाळून केलेली धडपड पाहिल्यानंतर आपल्या नावासोबत जोडले गेलेले बापाचे नाव सांगतांना उर अभिमानाने भरून मन सदगतीत होऊन डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू उभे राहतात.

आई बापाकडून अपत्याला काय हव असतं? बाल मनाच्या भावनांना साद घालून वाढत्या वयाबरोबर होणार्‍या संस्काराची शिदोरी आयुष्याची पुंजी ठरते. हे संस्कार आयुष्याला दिशा देत असले तरी आणखी एक भुख बालमनाला नेहमी आपल्या माता पित्याकडे अपेक्षेने आकर्षित करते. सहवास...होय! जेंव्हा हसण्या बागडण्याचे वय, फुलण्याची उमेद बाळसं धरत असते तेंव्हा आई आणि बापाने आपल्याशी हितगूज करावं, मायेने जवळ घ्यावे, कधी लाडाने तर कधी लटक्या रागाने दरडावून रूसावे असे त्या बालमनाला सतत वाटत असते. फरक एव्हढाच की, त्या भावना तेंव्हा सुप्त असतात. त्या तेव्हा व्यक्त होत नाहीत. जेव्हा हे मन किशोरावस्थेकडे झुकू लागते तेव्हा मित्रांना आई बापाचा विशेषतः बापाचा लाभत असलेला सहवास, बाप मुलात निर्माण झालेले ते बंध पाहिल्यानंतर मनाला एक वेगळी हुरहूर सतावू लागते. या नात्याच्या संदर्भात आपण कमनशिबी आहोत अशीही एक भावना मनाला स्पर्शून जाते. मात्र किशोरावस्थेतून तारूण्य ओलांडून जेव्हा प्रौढ म्हणजे आयुष्याची समज येते, आयुष्याचा अर्थ उमजू लागतो, आपण तेंव्हा ज्याला आयूष्य मानत होतो त्यापेक्षा आयुष्याचे वास्तव वेगळे आहे, ध्येयपुर्तीसाठी आयुष्यात केलेल्या अनेक तडजोडींकडे अपरिहार्यतेच्या नजरेतून पाहिले की बापाने मुलांप्रती असलेल्या भावनिक कर्तव्यात केलेले दुर्लक्ष त्याग म्हणून स्वीकारण्याची समज आपोआप येते. मग आपल्या बापाचा तो त्याग बापाचे समाजात निर्माण झालेले स्थान, त्याने कमावलेली माणसं, समाजातील उपेक्षितांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी स्वतःच्या कुटुंबांचे सुख ओवाळून केलेली धडपड पाहिल्यानंतर आपल्या नावासोबत जोडले गेलेले बापाचे नाव सांगतांना उर अभिमानाने भरून मन सदगतित होऊन, डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहतात. हे चित्र समाजात विविध क्षेत्रात यशोशिखर गाठलेल्या प्रत्येक महानुभवाच्या कुटुंबात,  त्यांच्या मुलाबाळांच्या मनाचा आलेख आहे. ज्याला मी, माझी ताई आणि आई देखील अपवाद नाही.
मी, रोहित अशोक सोनवणे... वय वर्ष 22. सिव्हिल इंजिनिअर. आमचे चार माणसांचे कुटूंब. आई शोभा, माझ्या पेक्षा मोठी असलेली माझी बहीण शितलताई आणि वडिल अशोक सोनवणे. वडिलांची आर्थिक पूर्वपिठीका सांगायची म्हटलं तर एकदम अठरा विश्‍व दारिद्र नसले तरी जगण्यासाठी धडपड करणे हीच त्यांची दैनंदिनी. हे ऐकून माहित असले तरी जेव्हापासून समजायला लागले, तेव्हा पासून मागेल ते हातात पडत असल्याने त्यांच्या पुर्व पिठीकेविषयी आज जाणवते तेव्हढे शल्य बालवयात जाणवत नव्हते. लाड पुर्ण होत असले, भौतिक सुखाची इच्छा मारण्याची वेळ तेव्हा कधी आली नसली तरी आपल्या वडिलांचा सहवास मिळत नाही, ही सल. कळत नसले तरी वडिलांची कधीतरी होणारी भेट मनाला त्रासदायक ठरत होती. वडिल व्यवसायाने शासकीय सिव्हिल काँन्ट्रक्टर. महाराष्ट्रभर वेगवेगळ्या कामासाठी राबता, फिरफिर. आठ दहा दिवस कधी महिना महिना घराकडे पाठ. 
शितल ताईने अनेकदा केलेला संवाद, ‘पप्पा सणासुदीला तरी आमच्या बरोबर रहा’ हा आजही जशाचा तसा कानात गुणगुणतो आहे. तात्पर्य हे की मला कळायला लागल्यापासून कुठल्याच प्रकारची कमतरता भासू दिली नसली तरी एक वडिल म्हणून मुलांसोबत जो वेळ घालवायला हवा होता तो दिला नाही. ही सल आजही बोचत असली तरी आज अशोक राव विठ्ठलराव सोनवणे, मुख्य संपादक दै. लोकमंथन, बहुजन चळवळीचे गाढे अभ्यासक, आरक्षणाच्या वादग्रस्त मुद्यावर मतभेदाच्या आगीत होरपळणार्‍या समाजाला सांधणारा नेता अशा विविध अंगांनी त्यांचा नामोल्लेख कानावर येतो तेव्हा एक वारस म्हणून आपल्या वाट्याला आलेली ही शिदोरी हरवलेल्या बालपणाच्या वेदनांवर फुंकर मारून जाते. नसेल मिळाला आपल्याला तेव्हा त्यांचा सहवास.. पण तो त्याग आज त्यांच्या कर्तृत्वाच्या रूपाने आपल्याला आयुष्याची पुंजी सव्याज देऊन गेला. हे समाधान खुप मोठे आहे. आपण त्यांच्या प्रेमाला तेव्हा उपेक्षित राहिलो असू, पण असंख्य उपेक्षितांचे संसार त्या त्यागाने बहरले हे समाधान कुठल्याही मुलाच्या डोळ्यात आपल्या जन्मदात्याविषयी कृतज्ञ भाव निर्माण होऊन त्यांच्या समोर नतमस्तक होण्यास पुरेसे आहे.
रोहित अशोक सोनवणे
व्यवस्थापकीय संपादक 
अहमदनगर.