Breaking News

ऑनलाईन कामांवर बहिष्कार घालण्याचा शिक्षक परिषदेचा इशारा


वरूर/ प्रतिनिधी, सध्या शाळांमधील शिक्षकांना पेपर तपासणी, निकालांच्या कामांसोबतच दहावी पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणही घ्यावे लागत आहे. त्यातच समग्र शिक्षा अभियान योजनेसाठी 25 एप्रिलपर्यंत ऑनलाइन माहिती भरून देण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढले आहे. त्यामुळे निकालाची कामे करायची की ऑनलाइन माहिती भरायची, असा सवाल शिक्षकांकडून केला जात आहे. हे आदेश तातडीने मागे न घेतल्यास कामांवर बहिष्कार टाकू, असा इशाराही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण सचिव मा.नंदकुमार यांना पत्राद्वारे दिला आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष सुरेश विधाते यांनी दिली आहे.
सध्या शाळांमध्ये परीक्षा संपल्या असून, आता पेपर तपासणी व निकालाची कामे सुरू आहेत. इयत्ता दहावी पुनर्रचित अभ्यासक्रमाचे सर्व विषयांचे प्रशिक्षण सुरू असून, 20 एप्रिलपर्यंत हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे. त्यातच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने आदेश काढून स्टुडंट डेटाबेस मॅनजमेंट इन्फॉर्मेशन सीस्टिम या प्रणालीत इयत्ता पहिली ते बारावीच्या मुलांची अद्ययावत माहिती भरून देण्याचे आदेश दिले आहेत. ही सर्व माहिती राज्य शासनाला केंद्राला देणे बंधनकारक असून, ही माहिती 1 मे च्या आत देण्याची मुदत आहे. त्यामुळेच शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी शिक्षणाधिकार्‍यांनी ही माहिती 25 एप्रिलपर्यंत भरून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.मात्र, आधीच निकालाचे काम, त्यातच प्रशिक्षण आणि आता हे काम करायचे असल्याने शिक्षकांवरील तणाव वाढला आहे. हे आदेश मागे घेण्यात यावेत. कारण शिक्षकांचे काम फक्त अध्यापनाचे असून, त्या व्यतिरिक्त त्यांना कोणत्याही प्रकारची अशैक्षणिक कामे देऊ नयेत, अशी मागणी मुंबई विभागातील शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण सचिवांना लिहिलेल्या पत्रात केली आहे, अन्यथा शिक्षक ऑनलाइन कामावर बहिष्कार टाकतील, असा इशाराही देण्यात आला आहे.