Breaking News

कठुआ बलात्कार : पीडितेच्या गुप्तांगामध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट

नवी दिल्ली : पीडितेच्या गुप्तांगामध्ये आढळलेले वीर्य हे आरोपीचेच असल्याचा महत्त्वाचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेने (फॉरेन्सिक लॅब) दिला आहे. संबंधित वीर्याचे नमुने तपासणीसाठी दिल्ली न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर हा अहवाल देण्यात आला.

दिल्लीच्या या प्रयोगशाळेने जम्मू काश्मीर पोलिसांनी जमा केलेल्या 14 पॅकेटमधील पुराव्यांच्या चाचण्या केल्या. यात पीडितेच्या गुप्तांगात सापडलेले वीर्य, केस, चार आरोपींचे रक्ताचे नमुने, पीडितेचा विसेरासह फ्रॉक आणि सलवार, साधी माती आणि रक्तमिश्रित माती यांचा समावेश होता. गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये मंदिरात आढळलेले दोन केसाचे नमुने देखील होते. त्यापैकी एका केसाचे डीएनए आरोपीच्या डीएनएशी जुळत आहेत, तर अन्य केसाचे डीएनए पीडितेच्या डीएनएशी जुळत आहे. याप्रकरणा संदर्भातील विस्तृत अहवाल जम्मू काश्मीर पोलिसांकडे जमा केल्याचीही माहिती मिळत आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा पुरावा समजला जातो. पीडितेच्या फ्रॉकवरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र तरिही त्यावर रक्ताचे काही नमुने सापडण्यात यश आले होते.