Breaking News

शेतकर्‍यांना पाणी न मिळाल्याने हजारो हेक्टर फळबागा उध्वस्त?


शेतकर्‍यांसाठी सोडण्यात आलेले उन्हाळी आवर्तन सुटून 25 दिवस झाले. मात्र चारी नं. 14 व 15 शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी न मिळाल्याने हजारो हेक्टर फळबागा उध्दस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गोदावरी कालव्यावर पाईपद्वारे होणार्‍या अनाधिकृत पाणी उपशामुळे शेतकर्‍यांना शेती पिकासाठी पाणी मिळण्यासाठी दिरंगाई होत आहे. या कालव्यावर अनेक शेतकर्‍यांचे खाजगी शेततळे आहे. ते तळे भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अनाधिकृतरित्या पाणी उपसा केला जातो. त्यामुळे टेलच्या शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी मिळणे कठिण झाले आहे. गोदावरी कालव्याचे उन्हाळी आवर्तन शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी 29 मार्च रोजी सुरु झाले. तब्बल 25 दिवस होवूनही 14 व 15 चारीवरील असणार्‍या शेतकर्‍यांच्या फळबागांना पाणी मिळाले नाही. 
गोदावरी पाटबंधारे विभागात शेती पाणी मागणीसाठी 2400 हेक्टर क्षेत्रासाठी शेतकर्‍यांनी सात नंबर फॉर्म भरले. मागील उन्हाळ्यात 800 हेक्टर पाणी मागणी अर्ज दाखल झाले होते. त्या तुलनेत यावर्षी तीन पटीने अर्ज आल्याने शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी देण्यासाठी दिरंगाई होत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगितले जाते. 

राहाता परिसरातील पेरु फळबागा राज्यात प्रसिध्द आहेत. सर्वात जास्त फळबागा राहाता येथील चारी नं. 14 व 15 या ठिकाणी आहे. जवळपास 1400 हेक्टर पेरु फळबागा राहाता परिसरात आहेत. दरवर्षी या फळबागांसाठी शेतकर्‍यांना पाणी मिळण्यासाठी दिरंगाई होते. अनेकदा या फळबागांना पाणी मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी फळबागांना कुर्‍हाड लावली आहे. राज्यात चांगला पाऊस झाल्याने गंगापूर, दारणा, मुकणे, वालदेवी, धरण पुर्ण क्षमतेने भरले होते. तसेच मराठवाड्यात पट्टयात पाऊस दमदार झाल्याने जायकवाडी धरण 100 टक्के भरल्याने यावेळी नाशिक येथील धरणातून पाणी सोडण्याचे प्रश्‍न उद्भवला नाही. असे असतांनाही जलसंपदा विभागाच्या अडमुठे धोरणामुळे उन्हाळ्यात लाभधारकांना पाण्याची आवश्यकता असतानाही पाणी मिळत नाही. गोदावरी कालव्यातून सोमठाणापासून ते चितळीपर्यंत या 110 कि.मी. अंतरावर कॅनॉलच्या जवळचे शेतकरी कॅनॉलमध्ये पाईप टाकुन अनाधिकृतपणे पाणी उपसा करीत असल्याने येथील टेलच्या भागाच्या शेतकयांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत.