Breaking News

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८७१ कोटींची कर्जमाफी

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख, ४७ हजार ४६२ शेतकऱ्यांना ८७१ कोटी ४४ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. यापूर्वीच्या कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत दिनांक १ मे, २०१८ पर्यंत वाढवली आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. 


राज्य शासनाच्या या योजनेत सहभागी असलेल्या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ निश्चितपणे मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पात्र २ लाख १० हजार ३९५ लाभार्थ्यांना ६१४.२३ आणि व्यापारी, ग्रामीण व खाजगी बँकामार्फत पात्र ३७ हजार ६१ लाभार्थ्यांना २५७.२१ असा एकूण २ लाख ४७ हजार ४६२ लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.