Breaking News

जगदंबा देवी व धर्मगुरू संत सेवालाल महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार


पाथर्डी ( प्रतिनिधी ) - बंजारा लमाण समाजाचे आराध्य दैवत जगदंबा देवी व धर्मगुरू संत सेवालाल महाराजांच्या मंदिराचे जिर्णोद्धार कार्य पूर्ण झाले असुन मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रातील भाविकांची वर्दळ वाढली आहे. या समाजाचे श्रध्दास्थान चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेतही वैशिष्टयपूर्ण सेवेसाठी आंध्र प्रदेश,कर्नाटक या परराज्यातुन बंजारा बांधव मढी व पाथर्डी येथे येतात. बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांचे मुळस्थान पोहरादेवी (जि. वाशिम ) येथे असुन महाराजांनी तेथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र माहुरच्या जगदंबा देवीची खुप सेवा केली . देवीच्या कृपेने त्यांना विविध अध्यात्मीक शक्ती प्राप्त झाल्या त्याचा उपयोग त्यांनी समाजाचे कल्याण,व्यसनमुक्ती धर्मकार्यासाठी करत समाज संघटन केले. याबाबत माहिती देतांना समाजातील कार्यकर्ते व संत सेवालाल महाराजांच्या कार्याचे अभ्यासक विष्णुपंत पवार म्हणाले बंजारा समाजाचे एकमेव श्रध्दास्थान संत सेवालाल महाराज असुन नाथ संप्रदायाशी त्यांचा घनिष्ट सबंध असल्याने बंजारा समाजात नवनाथांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपासना केली जाते. बंजारा समाजात प्रत्येक धार्मिक व कौटुंबीक कार्यक्रमात जगदंबा देवीची सर्वप्रथम पुजा होते. संत सेवालाल महाराजांमुळे या समाजात धर्मजागृती होऊन समाज संघटीत झाला. सुमारे बारा वर्षापूर्वी शहरातील आनंद नगर भागात अर्धा एकर परिसरात लोकसहभागातुन मंदिर जिर्णोद्धाराचे काम हाती घेतले. बंजारा समाजाचे धर्मगुरु राष्ट्रीय संत रामराव महाराज यांनी आनंदनगर याठिकाणी तीन वेळेस भेट देऊन येथील मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाचे कौतुक केले आहे व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व गोरबंजारा बांधवांना आशीर्वाद दिले आहेत रामराव महाराज यांना मानणारा बंजारा समाज हा त्यामुळे भरपूर प्रमाणात या ठिकाणी येऊन दर पोर्णिमेला जगदंबा देवी व संत सेवालाल महाराज यांचेे दर्शन घेतो. आमदार मोनिका राजळे यांच्या स्थानीक विकास निधीतुन भव्य सभामंडप बांधण्यात आला .तालुक्यात 33 तांडे असुन बंजारा लमाण समाजाची लोकसंख्या 50 हजारांच्या आसपास आहे. बीड औरंगाबाद, पैठण, अकोला ( विदर्भ ) बुलढाणा, नगर ,बारामती या भागातील भाविकांची वर्दळ वाढली असुन गेल्या बारा वर्षापासुन येथे राज्यस्तरीय मेळावा सेवालाल जयंतीच्या दिवशी घेतला जातो. समाजातील प्रमुख नेत्यांचे व महाराजांची उपस्थिती या मेळाव्याला लाभली आहे. शंभर झाडांची लागवड करून त्याचे संगोपन चांगल्या पद्धतीने झाले आहे. दर पौर्णिमेला भोग भंडारा व भजनाचे कार्यक्रम होतात नवरात्रोत्सवात घट स्थापना होऊन बंजारा समाजातील परंपरेनुसार देवीची सेवा होते . राष्ट्रसंत रामराव महाराज यांच्या प्रेरेणेने महाप्रसाद विविध सेवाकार्य पाथर्डीच्या केंद्रातुन सुरूअसुन अल्पावधीतच हे स्थान बंजारा समाजाचे श्रध्दास्थान बनले आहे.आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यातील भावीक मढी येथे कानिफनाथांच्या यात्रेसाठी येतात. नाथांच्या पालखीपुढे पारंपारिक वेषभूषेमध्ये बंजारा नृत्य सादर करतात नाथ दर्शनानंतर पाथर्डीच्या केंद्रात येऊन जगदंबादेवी , संत सेवालालमहाराज यांचे सेवा कार्य करत त्यानंतर माघारी जातात. सेवालाल महाराजांचे दर्शन घेऊनच यात्रा पूर्ण केली जाते. त्याचप्रमाणे रामनवमीला पोहरादेवी याठिकाणी संत सेवालाल महाराज यांची यात्रा भरते या यात्रेस पायी जाणार्या दिंडीह्या आता आनंदनगर पाथर्डी येथील मंदिरावर आपला मुक्काम करून त्याठिकाणी भजन सेवा अर्पन करतात आणि त्यानंतरच पुढे पोहरादेवी कडे आपल्या दिंडीचे प्रस्थान करतात.आगामी काळात लोकसहभागातुन विविध उपक्रम अंमलात आणले जातील. समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा अभ्यासिका मोफत उपलब्ध असुन वाचनालय चालवले जाते. बाहेरगावाहुन येणारे संत भाविक येथे निवास करतात . सामुहिक विवाहाची चळवळ हाती घेण्यात आली आहे. देवीची दररोज त्रिकाल आरती पुजा होते. माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक जयंती ,पर्यावरण दिन, गोरपंचायत , गोरसंस्कार, गोरबंजारा विकास परिषद , देवी भागवत कथा असे उपक्रम यशस्वीपणे घेण्यात येतात. राज्य शासनाने तिर्थक्षेत्र विकासाचा दर्जा देऊन मदत करण्याची समाजाची मागणी असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.