Breaking News

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे सोमवारी सायंकाळी पुण्यात निधन झाले.
काही दिवसांपूर्वी भाई वैद्य यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर पुना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र या उपचारांना त्यांचे शरीर हवा तसा प्रतिसाद देत नव्हते. परिणामी त्यांची प्रकृती आणखी खालावली, यातच त्यांची प्राणज्योत मालवली. 


तीन आठवडयांपूर्वी वैद्य यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विकारामुळे त्यांना श्‍वासोच्छवास घेण्यास त्रास होत आहे. त्यांच्यावर कार्डिऑक अतिदक्षता विभागात (सीसीयू) उपचार सुरू आहेत. त्यांना कृत्रिम श्‍वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांचे 89 वर्षांचे वय ध्यानात घेता त्यांचा आजार हा औषधांना सध्या पुरेसा प्रतिसाद देत नाही, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी दिली होती. गोवामुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रिय होते. या काळात त्यांनी जबरदस्त मारहाण आणि तुरूंगवास भोगला. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी 19 महिने तुरूंगवास सोसला. मूळ पिंड चळवळ आणि संघर्षाचा असल्याने त्यांना तब्बल 25 वेळा कारावासाचा ‘मान’ मिळाला! अगदी अलीकडे शिक्षणहक्कासाठी सत्याग्रह करून 88व्या वर्षी त्यांनी अटक करवून घेतली. मूल्याधारित राजकारण त्यांनी प्रिय मानले. चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली भारतयात्रेत त्यांनी चार हजार किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली. जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस, समाजवादी जन परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषविली आणि त्या पदांची उंची वाढविली. पुण्याचे महापौर आणि राज्याचे गृहमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.