Breaking News

डॉ. आंबेडकरांचे कार्य जगात महान : विखे


लोणी प्रतिनिधी  - भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हतबल, निराश आणि गलितगात्र झालेल्‍या समाजाच्‍या मनामध्‍ये क्रांतीची ज्‍योत पेटविली. वंचित समाज घटकांना सन्‍मानाने आणि समानतेने जगण्‍याची जिद्द दिली. त्‍यामुळेच केवळ भारतातच नव्‍हे तर, संपूर्ण जगातच त्‍यांचे कार्य महान ठरले, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे यांनी केले.

भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या १२७ व्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधून प्रवरा उद्योग समुहाच्‍यावतीने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या कार्यस्‍थळावर आयोजित करण्‍यात आलेल्‍या अभिवादन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पोपटराव लाटे होते. प्रारंभी भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्यास पुष्‍पहार अर्पन करुन विखे पाटील यांच्यासह संचालक मंडळाने अभिवादन केले.

विखे म्‍हणाले, शोषितांसाठी, वंचितांसाठी आणि जगाच्‍या कल्‍याणासाठी संघर्ष करणा-या थोर महापुरुषांमध्‍येच डॉ. आंबेडकरांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. एक अष्‍टपैलू व्‍यक्तिमत्‍व म्‍हणून आपण त्‍यांच्‍याकडे पाहातो. सामाजिक, शैक्षणिक आर्थिक आणि कायद्याबाबतचे अफाट ज्ञान असलेल्‍या या महान नेत्‍याने दिनदलितांच्‍या, श्रमिकांच्‍या आणि विस्‍थापितांच्‍या जीवनात ख-या अर्थाने प्रकाश आणला. डॉ. आंबेडकरांच्‍या सहवासात असलेल्‍या जगभरातील नेत्‍यांवर त्‍यांचा शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा मोठा परिणाम झाला. ज्ञानाची गंगा घरोघरी पोहचावी, यासाठीसुध्‍दा ते आग्रही असायचे. समाज परिवर्तनासाठी शिक्षण हेच प्रभावी शस्‍त्र असल्‍याचे त्‍यांनी जाणले होते. म्‍हणूनच आयुष्‍यभर त्‍यांनी शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला. माणून शिक्षणाने समृध्‍द झाला तरच चारित्र्याबरोबरच सुसंस्‍कृत विचार पुढे येतील, यावर ठाम विश्‍वास असणारे व्‍यक्तिमत्‍व आंबेडकरांच्‍या रुपाने देशाला लाभले होते.