Breaking News

एसटी वाहकाकडून प्रामाणिकपणाचे दर्शन

माणसांमधील प्रामाणिकपणा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे अनुभव ऐकायला मिळतात. अशावेळी हजारो रुपयांचा ऐवज आपल्याला आयता सापडला तर डोळे फिरल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र एका एसटी वाहकाने आपल्या बसमध्ये एका प्रवाशाचा राहिलेला हजारो रुपयांचा ऐवज परत करून प्रामाणिकपणा अजून शिल्लक आहे. हे दाखवून दिले आहे. हा प्रकार स्वारगेट बसस्थानकावर घडला.


सतीश गोरखनाथ उदमले असे प्रामाणिक एसटी वाहकाचे नाव आहे. सतीश उदमले अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आगारात कार्यरत आहेत. ते रविवारी श्रीगोंदा-पुणे या बसमध्ये वाहक म्हणून ड्युटीवर होते. दुपारच्या वेळी बस स्वारगेट बसस्थानकात आली. आपल्या सवयीप्रमाणे उदमले यांनी संपूर्ण बसमध्ये चक्कर मारली. यावेळी त्यांना एका सीटवर लेडीज पर्स मिळाली. ती पाहिली असता, त्यामध्ये अंदाजे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि 376 रुपये, आधारकार्ड असा ऐवज आढळला. आधारकार्डच्या मदतीने त्यांनी संबंधित महिलेचा शोध घेतला. असता अंजना प्रकाश बोरुडे (रा. सांडवे, अहमदनगर) असे महिलेचे नाव आहे. त्या महिलेच्या नातेवाईकांकडे सर्व ऐवज सुखरूप सुपूर्द करण्यात आला. यावेळी वाहतूक निरीक्षक पालवे, कार्यशाळा अधिकारी होले उपस्थित होते. उदमले यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.