Breaking News

गाव उद्ध्वस्त करुन बुलेट ट्रेन होऊ देणार नाही - आ. जितेंद्र आव्हाड


ठाणे, दि. 29, एप्रिल - बुलेट ट्रेनसाठी शिळ ते दिवा या पट्टयातील सात गावे बाधीत होत आहेत. या गावातील रहिवाशांना त्यांच्या जमिनीचा योग्य भाव दिल्याशिवाय आपण येथे सर्व्हे होऊ देणार नाही, अशा शब्दांत आ. जितेंद्र आव्हाड यांनी सर्व्हे करणार्या अधिकार्यांना आज ठणकावले. 

दिवा पंचक्रोशीतील म्हातार्डी येथील ग्रामस्थांनी आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ, सर्व्हे करणारे अधिकारी, तहसीलदार पाटील, मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पासलकर, रेल्वेचे पोलीस अधिकारीही उपस्थित होते. यावेळी शेतकर्यांनी आपल्या व्यथा आ. आव्हाड यांच्यासमोर मांडल्या. सर्व्हे करणारे अधिकारी कोणतीही नोटीस न देता आमच्या जागेची मोजमाप करीत असल्याचे त्यांनी आ. आव्हाड यांना सांगितले. त्यावर आ. आव्हाड यांनी अशा पद्धतीने सर्व्हे करुन देणार नाही. आधी मोबदला द्या त्यानंतर सर्व्हे करा, अशा शब्दांत त्यांनी सर्व्हे करणार्या यंत्रणेला झापले. तसेच, जी सात गावे या बुलेट ट्रेनमध्ये बाधीत होत आहेत. त्या गावांच्या न्याय्य हक्कासाठी आपण रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, शिळ ते दिवा अशी सुमारे सात गावे बुलेट ट्रेनच्या मार्गात आड येत आहेत. म्हातार्डीमध्ये स्टेशन बांधण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचा भाव निश्‍चीत केलेला नसताना सर्व्हे करण्यात येत आहे. आज हे लोक मुंगी होऊन घरात शिरत असून उद्या ते हत्तीच्या रुपात आमचे संसार उद्ध्वस्त करणार आहेत. त्यासाठीच आम्ही हा लढा उभारला आहे. आज सर्व्हे करणार्या अधिकार्यांना आम्ही भाव जाहीर करा; योग्य मोबदला द्या त्यानंतरच सर्व्हे करा, असे सांगितले आहे. जर, त्यांनी ही मागणी मान्य नाही केली तर लढाई अटळ आहे.