Breaking News

विश्‍वसुंदरी डायना सुंदर नाहीच, महाभारतात इंटरनेट शोधणार्‍या बिप्लव देवांचे अजब तर्कंट


नवी दिल्ली : त्रिपुरामधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले बिप्लव देव हे त्यांच्या कामकाजापेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळे अधिक चर्चेत येत आहेत. महाभारतात इंटरनेटचा शोध लावल्यानंतर आता त्यांनी डायना हेडनच्या सौंदर्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. 21 वर्षांपूर्वी मिस वर्ल्डचा खिताब डायनाने पटकावला होता. पण तिच्यात सौंदर्य काय आहे असा प्रश्‍नच त्यांनी विचारला आहे. देव यांना डायना सुंदर वाटत नाही पण ऐश्‍वर्या राय मात्र खरी सुंदरी वाटते. डायना सुंदरी नाही पण ऐश्‍वर्या हीच खरी भारतीय सुंदरी आहे असेही ते म्हणाले आहेत. ‘विविध स्तरांवर आयोजित होणार्‍या सौंदर्य स्पर्धा या बोगस असून, डायना मिस वर्ल्ड बनली, हे ठीक आहे, पण डायना हेडनचे सौंदर्य मला समजलेलेच नाही’ असे देव यांनी म्हटले आहे. ‘मात्र ऐश्‍वर्या खर्‍या अर्थाने भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करते’ असे त्यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही भारतीय महिलांना लक्ष्मी, सरस्वतीच्या रूपात मानतो असेही त्यांनी सांगितले. आगरतला येथे हातमाग कलाकाराच्या कार्यक्रमात ते बोल होते.