Breaking News

तहसीलदारांच्या खुर्चीस हार घालणार्‍या 6 जणांवर गुन्हा


कर्जतचे तहसीलदार किरण सावंत-पाटील यांच्या शासकीय खुर्चीला हार घातल्या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, नायब तहसिलदार सीताराम आल्हाट यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 7 मे रोजी दुपारी 12 च्या सुमारास कर्जतचे तहसिलदार किरण सावंत हे शासकीय कामानिमित्त बाहेर गेले असता, कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात कोरेगाव येथील ग्रामस्थांचे अंदोलन होते. यावेळी शिवाजी फाळके, पप्पु फाळके, सतीष परदेशी आणि दौलताड़े (सर्व रा. कोरेगाव ता. कर्जत ) यांच्यासह अज्ञात अजून दोन व्यक्ति यांनी कर्जत तहसील कार्यालयातील तहसीलदार यांच्या दालनात प्रवेश केला. यावेळी त्यांना तहसीलच्या मुलकी शिपाई वाय. बी. पठाण यांनी हटकले असता, त्यांनी त्यास न जुमानता तहसिलदार कुठे जातात? काय करतात? कार्यालयात किती वेळ हजर असतात हे आम्हाला माहीत आहे, असे म्हणत कार्यलयात जाऊन गोंधळ घालत कर्जत तहसिलदाराच्या शासकीय खुर्चीस हार घातला होता. सदरच्या प्रकारामुळे शासकीय विभागात मोठी खळबळ उडाली होती. वरील फिर्यादीनुसार भादवी कलम 141, 143 आणि 149 प्रमाणे 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो नि राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे.कॉ नरसिंह शेलार हे करीत आहे. 
आपण शासकीय कामकाजाच्या दिवशी तसेच दररोज सकाळी 10 वाजता कार्यालयात हजर राहत असतो. सोमवारी शासकीय कामासाठी अचानक बाहेर जावे लागले होते. यासह सदरचे अंदोलन हे ग्रामपंचायत यांच्याशी सलंग्न होते. आपला यांच्याशी काही संबध नव्हता. आपण बाहेर असताना अनधिकृतपणे त्यांनी दालनात शिरकाव करत खुर्चीला हार घातला होता. नायब तहसिलदार यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- किरण सावंत पाटील
तहसिलदार-कर्जत