Breaking News

दखल - मोदींकडून थापा

कर्नाटकच्या निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. त्यामुळं या निवडणकीत प्रचार कसा झाला, याचं मूल्यमापन करण्यास काहीच हरकत नाही. राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीत प्रचाराची दाणादाण उडविली. दोघंही जणू लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार करीत आहेत, असं चित्र होतं. पंतप्रधानांनी प्रचार करताना वारंवार मर्यादाभंग केला. वास्तविक त्यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखायला हवी होती. ती त्यांनी राखली नाही. मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून प्रचार करण्यापेक्षा एका पक्षाचा नेता म्हणून प्रचार केला. विदेशात त्यांनी काँग्रेसवर टीका करणं जसं औचित्यभंग होतं, तसंच विदेशीपणाच्या कालबाह्य मुद्यावरून सोनिया गांधी यांना टार्गेट करणंही चुकीचं होतं. राहुल गांधी यांनी सातत्यानं मोदी यांना देशाच्या प्रश्‍नावरून, गैरव्यवहारावरून प्रश्‍न विचारले. तसे मोदी विचारू शकले असते. परंतु, त्यांनी तसं केलं नाही. राहुल यांच्या कोणत्याही प्रश्‍नांना त्यांनी उत्तरं दिली नाहीत. उलट, मोदी यांच्याकडं मुद्दे नसल्यामुळं ते गुद्यावर आल्यासारखं चित्र होतं. काँगे्रसला त्यांनी थेट कुत्र्यांची उपमा दिली. मागं एकदा गुजरातच्या दंगलीत मृत्युमुखी पडलेल्यांबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांनी गाडीखाली अनेक कुत्री मरतात, त्याची मालकानं किती काळजी करायची, अशी विचारणा करून आपल्या मानसिकतेचा प्रत्यय आणून दिला होता. 

गुजरातच्या निवडणुकीच्या वेळी मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद हन्सारी तसंच अन्य राजनैतिक अधिका÷-यांच्या बैठकीचा असाच मुद्दा उपस्थित केला होता. त्या वेळी सरकारनं ठरविलेल्या बैठकीला हे मान्यवर उपस्थित होते. त्यात सरकारी अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीचा संदर्भ देऊन मोदी यांनी गुजरातच्या निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करीत असून काँग्रेसचे नेते या बैठकीला उपस्थित होते, असा आरोप केला होता. निवडणूक हातातून जात असल्याचं निदर्शनास येताच मोदी यांनी अशा खेळ्या केल्या. खोटं बोल; पण रेटून बोल अशी मोदी यांची प्रवृत्ती आहे, याचा प्रत्यय वारंवार येतो. महाराष्ट्रात जलसंधारणाचं काम चांगलं झालं, यात वादच नाही; परंतु याचा अर्थ जलशिवार योजनेतून झालेल्या कामामुळं भर उन्हाळ्यात हे तलाव, तळी भरली असा होत नाही. सध्या महाराष्ट्रात टँकरची संख्या वाढते आहे. या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकमध्ये प्रचार करताना पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात सगळी तळी भरलेली आहेत. सिंचनाचे फार मोठं काम तिथं झालंय आणि त्यामुळं पाण्याचा प्रश्‍न सुटला, असं धडधडीत खोटं विधान केलं. कर्नाटकला कावेरीचं पाणी देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी करण्याचं सोडून मोदी कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचं उदाहरण देतात, यावरून त्यांना खरंच प्रश्‍न सोडवायचा, की थापेबाजीचं राजकारण करायचं, असा प्रश्‍न पडतो. 
माणूस सतत इतकं खोटं का बोलत असावा? म्हणजे खोटं बोलणं हे व्यसन आहे का? निव्वळ राजकारणापोटी रोजच्या रोज इतकं धडधडीत खोटं बोलणं याआधी कुणालाही जमलेलं नाही. याचा अर्थ इतर नेते सज्जन होते असं नाही. खोटं आणि खरं, वस्तुस्थिती आणि प्रचार यातला फरक त्यांना माहीत नसावा. ते भान मोदींचं सुटलं आहे की काय असं वाटण्यासारखी स्थिती आहे. त्या पदावरच्या व्यक्तीचं हे भान सुटणं देशाला झेपणारं नाही. मोदींना आपण नेमकं काय बोलत आहोत आणि परिस्थिती नेमकी काय आहे याचं पूर्ण भान आहे असं हा वर्ग म्हणू शकतो. कारण त्यांचं खोटं बोलणं त्यांच्या नाही तर देशाच्या गळ्याशी येऊ शकतं. कर्नाटकची निवडणूक जिंकण्यासाठी मोदींनी जनरल थिमय्या यांच्याबद्दल काही खोट्या गोष्टी सांगितल्या. काही व्यक्ती या राजकीय वादाच्या पलीकडं ठेवायच्या असतात. त्यांना का एकदा तुमच्या तू तू मैं मैं मध्ये ओढलं की समाजात आदराची, सन्मानाची जी प्रतिकं असतात ती तुटून पडतात. नवीन प्रतिकं निर्माण होऊ शकत नाहीत. लोकांना प्रत्येक गोष्टीला संशय, द्वेष आणि विखार यांच्या काचेतून बघायची सवय लागते. यातून परस्परांना बांधून ठेवणारे जे धागे असतात ते हळूहळू विरळ होत जातात. गुजरातच्या निवडणुकीच्या वेळी धादांत खोटं विधान केल्याबद्दल राज्यसभेत प्रश्‍न विचारण्यात आला होता, त्या वेळी विरोधकांना सामोरं जाण्याऐवजी अरुण जेटली यांना उत्तर द्यायला भाग पाडण्यात आलं. त्यांनीही तो निवडणुकीतला मुद्दा होता, त्यात तथ्य नव्हतं, असं सांगितलं. मोदी यांच्यावर अशी वेळ वारंवार येते. ते मुद्दाम तसं करतात.