Breaking News

कराड तालुक्यातील मसूर येथील चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे गायब

मसूर, दि. 29 (प्रतिनिधी) : मसूर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे तसेच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मसूरच्या मुख्य चौकात लोकसहभागातून बसवलेलेे सीसीटीव्ही कॅमेरे वर्षभरापासून गायब आहेत. त्यामुळे मसूरमधील गुन्हेगारी कृत्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पो लिसांनी दुर्लक्ष केले असून ग्रामपंचायतीच्या कामकाजाविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

कराड व उंब्रजनंतर मसूरला मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. पंचक्रोशीतील नागरिक खरेदीसाठी या बाजरपेठेकडे वळले आहेत. गेल्या काही वर्षात मसूरच्या बाजारपेठेला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. येथील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तत्कालीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी लोकसहभागातून मसूरच्या जुन्या बसस्थानक चौकात सीसीटीव्ही कॅमेर्‍यारे बसविले होते. त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत झाले होते.
गतवर्षी खा. उदयनराजे भोसले यांच्या फंडातून मंजूर झालेल्या एलईडी लॅम्प बसवण्यासाठी अद्यावत खांब उभारला आणि हा चौक प्रकाशमान बनला. मात्र, या कामाकरिता त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेला खांब हटवण्यात आला. खांबावरील कॅमेरे तात्पुरते काढून ठेवल्याचे सांगण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा बसवले जातील, अशी अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही. हे कॅमेरे पूर्ववत बसवावेत, अशी मागणी नागरिकामधून वारंवार होत आहे. मात्र, ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करत आहे. 
गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात येथील सुहास पाटोळे या तरूणाचा मृत्यू झाला. धडक देणार्‍या वाहनाच्या चालकाने अपघातानंतर तेथून वाहनासह पळ काढला. यावेळी मसूर चौकात सीसीटीव्ही कॅमेरे असते तर पळून जाणार्‍या वाहनाचा माग काढण्यास पोलिसांना मदत झाली असती. चौकात कॅमेरे नसल्यामुळे गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांना खाजगी ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा आधार घ्यावा लागत आहे.
मल्हारपेठ-पंढरपूर, खंडाळा-शिरोळ राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग तसेच सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीला असलेले मसूर हे गाव वाहतुकीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. चोरट्यांना उंब्रज, क ोरेगाव, कराड, पंढरपूर या दिशेने पळून जाण्यासाठीचा हा जवळचा मार्ग आहे. तर चंदनचोरी व इतर गंभीर गुन्ह्यात सहभागी असणारे गुन्हेगार याच मार्गाने ये-जा करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या चौकातून टोल चुकवून जाणार्‍या वाहनांची वर्दळ तसेच धूमस्टाईलच्या चोर्‍या व सुसाट वेगाने धावणारे रायडर मंडळींचा राबता आहे. मसूरच्या मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसला होता. काही प्रमाणात येथील क्राईम रेट कमी झाल्याचे दिसत होते. तसेच अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी कॅमेर्‍यांचा चांगला पोलिसांना फायदा झाला होता. मात्र येथील सीसीटीव्ही कॅमेरे हटवल्याने पुन्हा गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे.