Breaking News

ऐतिहासिक महादरे तळ्याचा गाळ काढण्यास प्रारंभ


सातारा, दि. 14, मे - सातारा शहराची तहान मिटवण्यासाठी 200 वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांच्या पश्‍चात छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी महादरे तळे निर्माण केले. यावेळी खोदलेल्या तळ्याला घडीव दगडांच्या वापरातून आकार देण्यात आला. सातारा पालिकेने हे तळे स्वच्छ करण्याचा संकल्प केला आणि जलसंपदा विभागाची यंत्रसामुग्री वापरण्यासाठी नुकताच धनादेशही देण्यात आला. त्यामुळे गाळ काढण्याचे काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे काम करताना पाण्याचा वापर पूर्ववत सुरु करावा. अन्यथा येथे पर्यटन पॉँइट विकसित करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

सातारा शहराची भौगोलिक रचना वेगळी असून शहराला चारही बाजूंनी पाणी पुरवठा करण्यासाठी छोटे-छोटे प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये उभारण्यात आले. मात्र, सातारकरांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्यात एमजीपी-पालिकेला यश मिळाले नाही. पूर्वी महादरे तळ्यातील पाणी शहराच्या उत्तर भागासह अन्य भागाला दिले जात होते. घडीव दगड आणि खापरी पाईपच्या माध्यमातून तळ्यातील पाणी पुढे पाण्याच्या डब्यांमध्ये साठवण्यात येत. हेच पाणी मंगळवार तळे, कमळ तळे (शाहूकला मंदिर समोर), मोती तळे आणि काही ठिकाणी शहरात आणले गेले. या डब्या म्हणजे तळ्याच्या जलवाहिन्या असल्या तरी तेंव्हा त्या शहरासाठी रक्तवाहिन्याच होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये विकासाचा विंचू शहराच्या उत्तर भागात चांगलाच फोफावला. वाढणा-या इमल्यांसोबत डब्या आणि खापरी पाईप मोडून बाजूला पडल्या. प्रशासनाने लक्ष देत कारवाई करणे अपेक्षित असताना ते झाले नाही. महादरे तलावात साठणारे पाणी निचरा होत नसल्याने तुंबून राहू लागले. पाण्याचा वापर जेमतेम होत असताना तळे दुर्गंधीच्या विळख्यात सापडले. आता तळ्यातील गाळ काढण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. तळ्यातील गाळ निघेल, पण तळे वापरात राहणार का, हा सवाल उपस्थित झाला आहे.