Breaking News

लेख... कालचा भ्रष्टाचार बरा होता...!

भाजप सरकार सत्तेवर येताच डिजिटल भारताचे वारे वाहू लागल्याने सर्वसामान्य जनता हुरळून गेली. सरकार दरबारी ऑनलाईन कामामुळे पैसा खर्च होणार नाही. असा गोड समज सर्वसामान्य जनतेचा होता. मात्र हा समज काही वेळेत पूर्ण चुकीचा ठरल्याने जनता हवालदिल झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरून कुठलेच काम पैसा शिवाय होत नसल्याने कुठून झक मारली आणि कमळाच बटन दाबले असा पश्‍चाताप झाल्याची चर्चा जनतेतून करण्यात येत आहे.

शेतकरी विद्यार्थी व्यापारी कुठल्याही क्षेत्रात काम करताना ऑनलाईन अर्ज सादर केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ऑनलाईन मध्ये गम्मत म्हणजे अनेक अडाणी शेतकर्‍यांना अर्ज भरताना धडकी भरत आहे. कर्जमाफी योजनेचे अर्ज भरताना अनेक गावातील शेतकर्‍यांनी रात्रीचा दिवस केला होता. अनेक शेतकरी ऑनलाईन धक्क्याच्या तापाने फणफणले. या सरकारला ऑनलाईनची अवदसा कुठून आठवली अन् सामान्य जनतेच्या मुळावर उठली अशी चर्चा सुरू झाली. कर्ज माफ होणार या आशेने कामधंदा बुडवून शेतकरी अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफे समोर रांगा लावून होते. यातून एका बाजूला पैसा खर्च झालाच तर दुसर्‍या बाजुला उत्पादीत वेळही फुकट गेल्यामुळे सर्वसामान्य जनतेत संताप अधिक झाला. योजना कुठलीही असो तीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. डिजिटल भारताचे स्वप्न पडले असताना आता भ्रष्टाचार संपणार अशी भावना खुळीच ठरली. ऑनलाईन अर्ज दाखल करूनही पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले. जनतेत आता दगडापेक्षा विट मऊ अशी भावना बळावत असून काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार होत असला तरी तुलनेने कमी पैशात कमी वेळात आणि विशेष कमी मनस्तापात काम होत असल्याची प्रतिक्रिया खुलेआम व्यक्त होत आहे. (क्रमशः)