Breaking News

महाराष्ट्र किसान यमभूमी तर यमराजदूत मंत्रीमंडळाची रविवारी घोषणा

अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेस आणि सध्याच्या भाजप सरकारच्या राज्यात महाराष्ट्रात सुमारे तीन लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. शेतकर्‍यांच्या आत्महत्येसाठी सरकारचे शेतकरी विरोधी धोरण जबाबदार असताना, तर दूध व्यवसायात देखील शेतकर्‍यांचे दिवाळे निघाल्याने पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने रविवार दि.13 मे रोजी दु.3 वा. हुतात्मा स्मारक येथे महाराष्ट्र किसान यमराजभूमी तर महाराष्ट्राचे मंत्री मंडळ यमराजदूत मंत्रीमंडळ असल्याची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.


गेल्या सहा दिवसापासून महाराष्ट्रात दूधाच्या दरासाठी शेतकर्‍यांचे आंदोलन पेटले आहे. सरकारने जारी केलेला दूधाचा 27 रु. प्रति लीटर हमीभाव दूध संकलन करणारे संघ देत नाही. प्रत्यक्षात शेतकर्‍यांना दूधाला 16 ते 17 रु. प्रति लीटर भाव मिळतो. ही रक्कम दूध उत्पादन खर्चापेक्षा दहा रुपये ने कमी आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, हा घाट्याचा व्यवहार त्याला दररोज करावा लागत आहे. दूध हा शेतकर्‍यांसाठी जोडधंदा असून, दुधाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाला दूध व्यवसायाला मदत करण्याची गरज आहे. राजकीय पक्षाचे पुढारी, कार्यकर्ते व धनदांडगे दूध संघात कार्यरत आहे. यामुळे दूधसंघाला सरकारचे अभय मिळाले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.