Breaking News

ऑनलाईन आयपीएल सट्ट्यावर पोलिसांचा वॉच


सोलापूर, दि. 14, मे - आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू असताना त्यावर लावण्यात येणार्‍या सट्ट्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे सट्टेबाजांनी काही नवीन मार्ग शोधले आहेत. ड्रीम इलेव्हन यासारखे मोबाइल अ‍ॅप काढून सट्टा खेळण्याचा मार्ग अनेकजण चोखाळत आहेत. परंतु, असे अ‍ॅप डाऊनलोड करणार्‍यांवर पोलिसांची करडी नजर आहे. 

महिनाभरापासून आयपीएलच्या स्पर्धा सुरू आहेत. त्यावर शहरातील काही छंदिष्ट मंडळी बुकींवर फोन करून ठराविक खेळाडू, ठराविक संघ यांच्यावर रोख रकमेचा सट्टा खेळतात. यावर शहर पोलीस आयुक्तालयाने कारवाई क रीत अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यात जुगार घेणारा व त्याच्या मोबाइलवर आलेले कॉल्स यावरून संबंधितांवरही गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे आता काही जणांनी  विविध प्रकारच्या अ‍ॅप्स डाऊनलोड करून त्यावर पैसे लावण्याचे प्रकार सुरू केले आहेत. या अ‍ॅपद्वारे सट्टा लावल्यावर आपण सुरक्षित आहोत. कुणाला हे निदर्शनास येणार नाही असा खेळणार्‍यांचा समज आहे. परंतु सोलापूर पोलिस आयुक्तालयाने आपल्या सायबर सेल या कक्षाद्वारे यावर नियंत्रण मिळवण्याचे ठरवले असून आता असा सट्टा खेळणार्‍यांवर ही चाप बसणार आहे.