Breaking News

महावितरणविरुद्ध सिद्धटेकला रास्तारोको


कुळधरण : कर्जत तालुक्यातील सिद्धटेक जवळील वडार समाजवस्ती येथील ग्रामस्थांनी विद्युत महावितरणच्या कारभाराविरोधात दौंड-राशीन राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. वीजतारांचा धोका असताना महावितरणकडुन दुर्लक्ष होत असल्याने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी राशिन येथील कार्यालयात या प्रश्‍नासंदर्भात निवेदन दिले होते. मात्र त्याची दखल न घेतल्याने काल सकाळी दहा वाजता ग्रामस्थांनी रस्त्यावर बसुन आंदोलन केले. रस्ता अडविल्याने पुणे, दौंड, बारामती, श्रीगोंदा, कर्जतकडे जाणारी वाहतुक ठप्प झाली होती.

वडार वस्तीवरती शेतीसाठी व घरगुती वीजपुरवठा करणार्‍या वीजवाहीनीच्या तारा धोकादायक आहेत. वादळी पावसामध्ये अनेक वेळा तारा तुटून पडण्याच्या घटना यापूर्वी घडल्या. तसेच प्राथमिक शाळेजवळून जाणार्‍या वीजवाहीनीही धोकादायक बनली आहे. यामुळे जीवित व वित्त हानी होऊ शकते. त्यामुळे ग्रामस्थांनी महावितरणकडे वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार करून काहीच दखल न घेतल्याने आंदोलन करण्यात आले. सिद्धटेक परिसरातील वीज वाहीनीच्या तारा कमजोर झाल्या असुन, अनेक ठिकाणचे लोखंडी खांब कुजले आहेत. शेतामधील खांब ही अनेक ठिकाणी कललेले आहेत. यामुळे भविष्यात होणारा धोका टाळण्यासाठी स्थानिक नागरिक व वायरमन यांना धोकादायक खांब व वीजवाहिनीचा सर्वे करण्यास सांगून त्याची पावसाळा सुरू होण्यापुर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली. 

या मागण्या संदर्भातील निवेदन राशीन महावितरण विभागाचे उपअभियंता यांनी स्विकारले. जळालेले विद्युत रोहित्र व वीजवाहीनीच्या तारा आठ दिवसामध्ये बदलून दिल्या जातील असे लेखी आश्‍वासन यावेळी देण्यात आले. त्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले. आश्‍वासनाप्रमाणे महावितरणने उपाय योजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नितिन जाधव, सुभाष चौगुले, नवनाथ मोरे, बालाजी शेलार, राहुल हरिहर आदींनी दिला.