Breaking News

मंजूर बंधाऱ्याची दुरुस्ती युद्धपातळीवर


कोपरगाव : तालुक्यातील गोदावरी नदीवर ३० वर्षांपूर्वी संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी हिंगणी, मंजूर आणि सडे (संयुक्त) हे बंधारे बांधले. यासाठी ५ कोटी ४४ लाख रूपये खर्च आला होता. नदीकाठालगतच्या ८ हजार ५४० एकर शेतक-यांचे हे बंधारे जीवनदायिनी बनले आहेत. दुर्दैवाने यातील मंजूर हा बंधारा २०१७ च्या महापुरात फुटला. त्याची दुरूस्ती संजीवनी प्रशासनाच्या पुढाकाराने युध्दपातळीवर सुरू झाली आहे. 
या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी गेली महिनाभर १५ ते १७ ट्रॅक्टर माती भराव कामासाठी एक पोकलॅन मशिन तर शासनाच्या जलसंपदाविभागाकडून एक बुलडोझरच्या सहाय्याने हे काम अहोरात्र सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात त्यात पन्नास टक्के पाणी साठा साठेल, असा अंदाज आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी संजीवनी कार्यक्षेत्रात तसेच मतदारसंघात पडणा-या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यांसाठी मोठे काम केले आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजने अंतर्गत लोकसहभाग व संजीवनी कारखान्याच्यावतीने सुमारे शंभर साठवण तलाव, पाझर तलाव, शेततळी, दगडी साठवण बंधारे यातील गाळ काढला आहे. दरवर्षी बंधा-याची देखभाल, दुरूस्तीदेखील कारखान्यामार्फतच केली जाते. त्यामुळे शेतक-यांना त्यांच्या पिकांसह जनावरांना प्रत्येक हंगामात शाश्वत पाणी मिळत आहे.

मंजूर येथे गॅबीयन वाॅल बांधण्याबाबत शासनस्तरावर कारखान्याने मोठया प्रमाणात पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात आला. त्याचप्रमाणे २१ वर्षापूर्वीच्या जीर्ण झालेल्या ६४८ लोखंडी फळ्या नव्याने मिळाव्यात व मंजुर बंधारा दुरूस्तीसाठी शासनांकडुन बुलडोझर मिळावा, यासाठी आ. स्नेहलता कोल्हे यांनी मोठा पाठपुरावा केला. त्यामुळे या बंधा-याच्या दुरूस्तीचे काम एक महिन्यांपूर्वी मंजुर आश्रमाचे शिवानंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. ते जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.