Breaking News

श्रीदेवींच्या मृत्यूची चौकशी नाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका


नवी दिल्ली - अभिनेत्री श्रीदेवींच्या मृत्यूबाबत चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. दुबई येथील एका हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून श्रीदेवींचा मृत्यू झाला होता. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर व न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. 5.7 फूट उंच व्यक्ती 5.1 फूटाच्या टबमध्ये कशी काय बुडू शकते, असा प्रश्‍न वरिष्ठ वकील विकास सिंह यांनी उपस्थित केला होता. श्रीदेवींच्या मृत्यूशी संबंधित दुबई पोलिसांनी दिलेल्या वैद्यकीय अहवालासह चौकशीची सर्व कागदपत्रे भारतात आणण्यात यावी, अशी मागणी सिंह यांनी केली होती. या प्रकरणाचा तपास स्वतंत्र संस्थेद्वारे करण्यात यावा अशीही मागणी त्यांनी केली होती. श्रीदेवींचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याचे सिंह यांनी न्यायालयाला सांगितले होते. याचिकाकर्ते सुनील सिंह यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या याचिकेत त्यांनी श्रीदेवींच्या वीम्याचाही उल्लेख केला होता.