Breaking News

भिलार गावाने वाचन संस्कृती जोपासली : आ. थोरात


संगमनेर महाराष्ट्राला निसर्गाचा मोठा वारसा आहे. समुद्र किनारा, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा हे नेहमी पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. याच सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महाबळेश्‍वरजवळील भिलार या गावाने पुस्तकांच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासली, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. 
साहित्य आणि वाचनाची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या भिलार या गावाला माजी महसूलमंत्री आ. थोरात यांनी भेट दिली. यावेळी अनेक पुस्तके चाळत या गावाच्या कामाबद्दल त्यांनी कौतुक केले. सातारा जिल्ह्यातील भिलार हे गांव जगाच्या नकाशावर आले ते पुस्तकांमुळेच. या गावाला मोठी पुस्तक व ग्रंथ संपदा आहे. राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर नेहमीच या गावाला भेटी देत असतात. स्व. यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार म्हणून ख्याती असलेले राज्याचे नेते आ. थोरात यांनी या गावाला भेट देऊन येथील पुस्तक व्यवस्थापन पद्धतीची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत किसन भिलारेंसह भिलारे आणि सातारा जिल्ह्यातील काँग्रेस आणि अन्य पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार थोरात म्हणाले, धार्मिक, साहित्यीक व विविध क्षेत्रातील सुमारे 15 हजारांच्या वर पुस्तके या गावात आहे. येणार्‍या पर्यटक व साहित्यप्रेमींना येथे पुस्तकांनी रंगविलेल्या बोलक्या भिंती, विविध पुस्तके पहावयास मिळतात. या पुस्तकांची अल्प दरात खरेदीही करता येते. खरे तर हे गांव आदर्श गांव असून नव्या पिढीसाठी एक अनमोल ठेवा ठरणार्‍या या गावाचा उपक्रम देशात दिशादर्शक असल्याचे कौतुक ही आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी भिलार वासियांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे जंगी स्वागत केले व आमदार थोरात हे यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार असून त्यांच्या भेटीने खूप आनंद झाल्याचेही अनेक गावकर्‍यांनी म्हटले आहे.