Breaking News

परंपरा व पर्यावरण जपणार्‍या आदिवासींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे : सुनिल देशपांडे


नगर : आधुनिक विकास हा नैसर्गिक संपत्ती ओरबडून करण्यात येत आहे. स्वत:ला प्रगत म्हणवणारे निसर्गाचा नाश करीत असून जंगलात निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे आदिवासी खर्‍या अर्थाने निसर्ग जपणारे व त्याच्याप्रती आदरभाव व्यक्त करणारे आहेत. त्यामुळेच आदिवासींच्या परंपरा या अंधश्रध्दा नसून त्यातून ते निसर्गाप्रती असलेली बांधिलकी जोपासतात. हा समाज पर्यावरणावर बोलत नाही तर पर्यावरण जपण्याचे काम करीत असतो. आजची आधुनिकता आपल्याला गिळंकृत करण्याचे काम करीत असून ती जीवनशैली नष्ट करणारी आहे. नैसर्गिक जीवनशैली राखण्याचे मोठे काम आदिवासींकडून होत आहे. त्यामुळे आदिवासींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून त्यात सकारात्मकता आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मेळघाट येथील ग्राम ज्ञानपीठाचे संस्थापक सुनिल देशपांडे यांनी केले.

नगरमधील माऊली सभागृहात वनवासी कल्याण आश्रम नगर शाखा आयोजित कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेत मेळघाटातील वनवासी या विषयावर व्याख्यानमालेतील चौथे पुष्प गुंफताना देशपांडे बोलत होते. यावेळी जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जगदीश कदम, वनवासी कल्याण आश्रमाचे जिल्हाध्यक्ष मेघशाम बत्तीन, शहराध्यक्ष प्रशांत मोहोळे आदी उपस्थित होते.

मेळघाटातील आदिवासींचे जीवन, संस्कृती याबाबत सविस्तर विवेचन करताना देशपांडे पुढे म्हणाले की, मेळघाटाकडे कुपोषणाचे आगार म्हणून पाहिले जाते. आपल्याकडील बरीच मंडळी या भागात कुपोषणग्रस्त बालके पाहण्यासाठी येतात. प्रत्यक्षात त्यांच्यासाठी केले काहीच जात नाही. आदिवासींकडे पाहण्याचा आपल्या तथाकथित प्रगत समाजाचा दृष्टीकोनच चुकीचा आहे. हि मंडळी आपल्या पूर्वापार परंपरा जपत जीवन जगतात. आम्ही या भागात काम सुरू केले तेव्हा आधी त्यांचा विश्वास संपादीत केला. या भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या बांबूपासून विविध उत्पादने तयार करून त्यांना रोजगार मिळवून दिला. बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्याचे रितसर शिक्षण दिले. यातून आज मोठा उद्योग उभा राहिला आहे. जवळपास सहा हजार बांबू कारागीर या शिक्षणातून तयार झाले असून साडेचार हजार लोक आज प्रत्यक्ष या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. मेळघाटात सुरू असलेले हे काम खर्‍या अर्थाने मेक इन इंडिया, स्टार्ट अप आहे. आदिवासी तरूण दरवर्षी अतिशय उत्कृष्ट डिझाईनच्या राख्या बनवून त्याची विक्री करतात. या कामातून मिळणारा मोबदला हि खरी त्यांना मदत आहे. त्यांच्यासाठी केवळ खिचडीचे भोजन देवून त्यांना खरा न्याय मिळणार नाही. तर त्यांच्या कारागीरीला प्रोत्साहन देवून त्यांची उत्पादने खरेदी केली पाहिजे. ते त्यांना सन्मानाचे भोजन मिळवून देईल.

येथील युवकांनी कच्छ येथील भूकंपानंतर तिथे जावून बांबूच्या टिकाउ आणि मजबूत घरांची उभारणी करून दिली. आज विविध भागात १६०० बांबूची घरे या लोकांनी साकारली आहेत. केंद्र सरकारनेही बांबूला लाकूड न म्हणता त्याला गवताचा दर्जा दिला आहे. त्यामुळे बांबू उत्पादन, वाहतूक, लागवडीला चांगले प्रोत्साहन मिळाले असून अनेक निर्बंध दूर झाले आहेत.

आदिवासींमधील प्रत्येक जमातीच्या नावामागे कार्यसंस्कृती आहे. ती त्यांनी टिकवून ठेवली आहे. ते आजारी पडल्यावर वनौषधी वापरतात. त्यापूर्वी ते या झाडांची पूजा करतात मगच त्याची पाने, फुले औषध म्हणून वापरतात. यात अंधश्रध्देचा भाग नसून पर्यावरणाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असते. ग्राम ज्ञापीठाची उभारणी करताना आदिवासींच्या जीवनशैलीपासून खुप शिकायला मिळाले. त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरा, संस्कृतीची महती कळून आली. त्याआधारावरच खरा विकास काय हे कळले. आपल्या प्रगत म्हणवल्या जाणार्‍या समाजाने जीवनाकडे कसे पहावे, खरा विकास काय असतो हे या आदिवासींपासून शिकले पाहिजे. आदिवासींना त्यांना सामर्थ्याची जाणीव करून दिली पाहिजे. यातूनच खरा आदिवासी विकास साधला जाईल, त्यांचे प्रश्न सुटतील असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला.

जगदीश कदम यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानमार्फत पुण्याजवळ उभारण्यात येणार्‍या शिवसृष्टी प्रकल्पाची माहिती दिली. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्त्वाकडे असून याच वर्षी या कामाचे लोकार्पण होईल, असे त्यांनी सांगितले.

वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याची माहिती देताना शेखर भावे यांनी सांगितले की, वनवासींचे जीवन शेती व जंगलातील नैसर्गिक संपत्तीवर अवलंबून आहे. यासाठी वनवासी कल्याण आश्रमातर्फे त्यांना आधुनिक शेतीचे शिक्षण दिले जाते. शेतीक्षेत्रातील तज्ज्ञांकडून भातशेती, फळभाजी, भाजीपाला उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहचवले जाते. शेळीपालन, गोपालन या शेतीपूरक उद्योगातून उत्त्पन्न मिळवण्यासाठीही त्यांना मार्गदर्शन केले जाते. याशिवाय त्यांच्यातील अंगभूत कलागुण ओळखून मल्लखांब, मॅरेथॉन, खो-खो, तिरंदाजी या खेळांचेही रितसर प्रशिक्षण दिले जाते. यातून अनेक चांगले खेळाडू तयार होत असल्याचे भावे यांनी सांगितले.

या व्याख्यानमालेसाठी नगर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप.बँक, टीजेएसबी सहकारी बँक, जनता सहकारी बँकेचे सहकार्य लाभले आहे. प्रशांत आढाव यांनी व्याख्याते देशपांडे यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालक निळकंठ देशपांडे यांनी कदम यांचा परीचय करून दिला. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी प्रेरणा गीत सादर केले. पसायदानाने या व्याख्यानाची सांगता झाली.