Breaking News

वडनेर हवेली येथे बालसुसंस्कार शिबीर उत्साहात

पारनेर तालुक्याातील वडनेर हवेली येथे बाळकृष्ण महाराज सोनूळे यांनी लहानग्यांसाठी बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले. त्याची सांगता तसेच काशी विश्‍वेश्‍वराच्या दर्शनासाठी गेलेल्या गावातील 90 लोकांच्या गंगापूजन महासोहळ्याचा कार्यक्रम वडनेर हवेली येथे उत्साहात संपन्न झाला. 
वडनेर हवेली येथे 24 एप्रिलला बाल सुसंस्कार शिबिराला सुरुवात झाली होती. गेली 10 दिवस चाललेल्या शिबिरामध्ये योगाचे मार्गदर्शन, हनुमान चालीसा, गीतेचे अध्याय, गायन, वादन, हरिपाठ पाऊले, व्यक्तिमत्त्व विकास आदींची शिकवण तसेच प्रवचन व कीर्तन यातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. विकासनंदाजी मिसाळ, रामायणाचार्य संजय पाचपोळ, महादेव काळे, रामचंद्र दरेकर, कचरू चव्हाण, नितीन शिंदे यांनी मार्गदर्शन केले. 

वडनेर हवेली येथील किरण भालेकर हल्ली पोलिस उपनिरीक्षक पुणे ग्रामीण, सतीश भालेकर इंजिनिअर, साहेबराव भालेकर, राजेंद्र हारदे, सतीश भालेकर यांनी लहानग्यांना करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले.
या शिबिराची सांगता शिबिरातील मुलांनी गावातून वाजतगाजत दिंडी सोहळा काढून केली. यावेळी काल्याचे कीर्तन बाळकृष्ण महाराज सोनुळे यांनी केले. शिबिरात सहभागी झालेल्या 60 मुलामुलींना ग्रामस्थांच्या वतीने वारकरी गणवेश वही व पेन देण्यात आले. त्याचप्रमाणे आज. श्रीमंत शंकराचार्य वारकरी प्रतिष्ठानच्या वतीने सहभागी मुलांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. बालसंस्कार शिबिराचे आयोजन गेल्या तीन वर्षांपासून वडनेर हवेली येथे होत असून, गेल्या दोन वर्षांपेक्षा यावर्षी विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक होता. या शिबिरातून येणारी भावी पिढी वारकरी संप्रदायाची प्रेरणा घेऊन सुसंस्कारीत होईल, यासाठी अधिकाधिक पालकांनी आपल्या मुलामुलींना अशा प्रकारचे शिबिरांना पाठवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान काशी दर्शनासाठी गेलेल्या नव्वद भाविकांचे सामुदायिक गंगापुजनाचा महासोहळा वडनेर हवेली येथील सभामंडपामध्ये पार पडला. त्यानंतर अन्नदान करण्यात आले. यावेळी हभप. बबन कुटे, हभप.गायकवाड माऊली, हभप. साहेबराव सोनुळे व वडनेर हवेली येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.