Breaking News

राशीनच्या देवी मंदिराचे विकास काम निकृष्ट : रेणुकर


कर्जत : तालुक्यासह राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राशिन येथील श्री. जगदंबा देवी मंदिराच्या शासन पर्यटन तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून कामाचा दर्जाही निकृष्ट असल्याचा आरोप मंदिराचे विश्‍वस्त सुभाष रेणुकर यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

राशिन येथील श्री जगदंबा देवी परिसरात शासनाच्या पर्यटन तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत मंदिर परिसराचे सुशोभिकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये सभामंडप बांधणे, मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, स्वच्छतागृह बांधणे आणि मंदिरामागील रस्त्याचे डांबरिकरण करने या कामांचा समावेश आहे. यासाठी पर्यटन विभागाकडून 1 कोटी 45 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त करण्यात आला आहे. सदर कामाचे उद्घाटन राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी राम शिंदे यांनी ठेकेदारांस पेव्हिंग ब्लॉक बसविन्याचे काम शतचंडी महोत्सवापुर्वीच करण्याचे आदेश दिले होते. यासह कामाचा दर्जा ही चांगला राखावा असे बजावले असताना संबंधित ठेकेदाराने हे काम 27 एप्रिल पर्यंत पूर्ण केले नसल्याचा आरोप रेणुकर यांनी केला आहे. तसेच सदर काम आजतागायत संथ गतीने सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. वापरण्यात येणारे पेव्हिंग ब्लॉकही निकृष्ट दर्जाचे असून ते बसविताना फुटले जात आहे. संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे येणार्‍या भाविकांना मोठा मनस्ताप होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 


दोषी ठेकेदारासह संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईची मागणीमंदिरासमोर सुरू असलेल्या पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या कामासाठी वापरण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक नित्कृष्ठ दर्जाचे आहेत. सदर ब्लॉक हे 60 एमएमचे असून ते सामान्य पदचारी मार्गासाठी वापरले जात आहेत. मंदिरालगत सतत अवजड़ वाहतुक केली जात आहे. त्यामुळे ते फुटण्याची शक्यता आहे. यासह आराखडा बनवताना प्रत्यक्ष कामाची पाहणी न करता बनविला असल्याचा आरोप ही रेणुकर यांनी निदर्शानास आणून दिला आहे. त्यामुळे दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर न्यायालयीन कारवाई करणार असल्याचे सुभाष रेणुकर यांनी दै. लोकमंथनशी बोलताना व्यक्त केली.