Breaking News

उष्णतेच्या लाटेमुळे राज्यात विजेची विक्रमी मागणी

मुंबई : राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याने विजेच्या मागणीतही विक्रमी वाढ होत आहे. रविवारी दुपारी राज्यात 21 हजार 396 मेगावॉट विजेची उच्चांकी मागणी नोंदवली गेली. त्यामध्ये मुंबईतील विजेची मागणी 2 हजार 580 मेगावॉट इतकी होती. भारनियमन न करता महावितरण कंपनीकडून विजेची ही मागणी पूर्ण केली जात आहे. कोयना जल विद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता बाबर यांनी ही माहिती दिली.

वीज क्षेत्रात वितरण व पारेषण यंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे नियमितपणे सुरू असताना सर्वाधिक मागणीएवढाच पुरवठा करणे महावितरणला शक्य झाले आहे. महानिर्मिती कंपनीसह जिंदाल, अदानी, टाटा, रिलायन्स, वर्धा पॉवर, धारिवाल पॉवर यांच्या हायड्रो पॉवर प्रकल्पातून 14 हजार 380 मेगावॉट वीज उपलब्ध करण्यात आली आहे. नाशिक, कोराडी, खापरखेडा, पारस, परळी, चंद्रपूर, भुसावळ येथील औष्णिक प्रकल्पांमधून 6 हजार 202 मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे. उर्वरित वीज केंद्र सरकारकडून खरेदी केली जात आहे. कोयना प्रकल्पाच्या एक ते चार टप्प्यांतून 1960 मेगावॉट वीज तयार केली जात आहे. प्रकल्पाचा चौथा टप्पा केवळ मागणीच्या काळात म्हणजे सकाळी आणि सायंकाळी सुरू केला जातो. त्यामुळे दुपारी या प्रकल्पातून केवळ एक हजार 96 मेगावॉट निर्मिती सुरू होती. मात्र विजेची मागणी वाढल्याने हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालविला जात असल्याचे बाबर यांनी सांगितले.