Breaking News

कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे निधन

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर (67) यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. बुधवारी सकाळी 4.35 सुमारास त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्‍वास घेतला. फुंडकर हे तीन वेळा अकोला मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अशी महत्वाची पदे भूषवली होती. फुंडकर यांच्या निधनाने पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता हरपल्याची भावना आहे. या वृत्ताने आपल्याला मोठा धक्का बसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. फुंडकर पक्षामध्ये भाऊसाहेब या नावाने परिचित होते. पांडुरंग पुंडलिक फुंडकर म्हणजेच भाऊसाहेब फुंडकर यांचा जन्म 1950 मध्ये बुलडाण्यातील खामगाव जिल्ह्यात झाला.

फुंडकर पहिल्यांदा 1978 मध्ये आमदार म्हणून निवडून आले. 1985 पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्र भाजपचं अध्यक्षपद भूषवलं होतं. 1991 ते 96 या काळात त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं फुंडकरांनी विधानपरिषदेतील विरोधपक्षनेतेही होते. सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व त्यांनी दिल्लीत केलं. फुंडकर भाजपचे उमेदवार म्हणून नवव्या, दहाव्या आणि अकराव्या लोकसभेत अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तर 1978 आणि 1980 मध्ये फुंडकर खामगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.8 जुलै 2016 रोजी त्यांनी फडणवीस सरकारमध्ये कृषिमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या खामगाव येथील निवासस्थानी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. फुंडकरांचे स्नेही, पक्षकार्यकर्ते, नेते मंडळी यांच्यासह शेतकरी फुंडकरांच्या निवासस्थानी हजर झाले आहे. पांडुरंग फुंडकर यांचे पार्थिव गुरूवारी दुपारी अकोला येथील विमानतळावर येणार आहे. तिथे काहीकाळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर फुंडकरांचे पार्थिव खामगावकडे रवाना होईल. फुंडकरांचा मतदारसंघ असणार्‍या खामगावमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. शुक्रवारी 1 जूनला सायंकाळी सिद्धिविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात पांडुरंग फुंडकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती अकोला भाजपचे प्रवक्ता गिरीश जोशी यांनी दिली आहे.