Breaking News

इंटरनेटच्या युगात प्राण वाचविण्यासाठी अशीही धडपड!


संगमनेर : इंटरनेटमुळे माणसाला माणसासाठी जगायला वेळ राहिला नाही, असे जरी म्हटले जात असले तरी येथील तुषार ओहरा हा तरूण याला अपवाद आहे. अनेकांचे प्राण वाचविण्याचे काम ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ समुहाच्या माध्यमातून हा तरुण करीत आहे. त्याने व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून सर्वच रक्त गटाचे समुह स्थापन केले आहेत. 
या व्हॉटसअ‍ॅपच्या समुहात संगमनेरसह मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर यांसह अनेक शहरातील सुमारे दोन हजारांहून अधिक रक्तदाते जोडले गेले आहेत. हा समुह रक्ताची गरज असलेल्यांसाठी वरदान ठरला आहे. प्रत्येक प्रकारच्या रक्तगटाचे रक्त रुग्णास सहज आणि त्वरित उपलब्ध होत असल्याने या माध्यमातून आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक जणांचे प्राण वाचले आहेत. प्रत्येक प्रकारच्या रक्तगट असलेल्या समुहात तरूणांसह डॉक्टर, शिक्षक, वकील, चाकरमाने, सरकारी व खासगी क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी, लोकप्रतिनिधी, माध्यम समुह अशा अनेकविध क्षेत्रातील लोक आहेत. ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ समुहाच्या माध्यमातून रक्ताची गरज पूर्ण होते आहे.

रक्तदानासाठी महिलांचाही पुढाकार 
‘रक्तदान श्रेष्ठ दान’ या सुमहात पुरुषांसह संगमनेरातील महिलांचाही एक समुह सक्रीय आहे. यात प्रत्येक प्रकारच्या रक्तगटाच्या सुमारे शंभर मुली व महिला रक्तदात्या एकत्रित जोडल्या गेल्या आहेत. रुग्नाला रक्ताची गरज भासल्यास या महिला रक्तदात्या कुठलीही वेळ व काळ न बघता तात्काळ रक्तदानासाठी हजर होतात. यात स्वप्नाली तापडे, किर्ती साबळे, पुनम लोहे यासह अनेक मुली व महिलांचा पुढाकार आहे.