Breaking News

बनावट औषधे प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा


नाशिक, दि. 16, मे - बनावट औषधे तयार करून त्यांची विक्री केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी एका आयुर्वेदिक क्लिनिकमधील डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीरेंद्र कुमारनसिंग गिरासे (रा. पेठकर प्लाझा, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित डॉक्टरचे नाव आहे. त्याने बी. ए. एम. एस. ही पदवी धारण केली असून, त्याने रुग्णांना व नागरिकांना आयुर्वेदिक औषधामध्ये अ‍ॅलोपॅथीची औषधे टाकून या औषधांची विक्री केल्याचे समोर आले आहे.त्याच्याकडे औषधे बनविण्याची कोणतीही परवानगी नसून, फेब्रुवारी 2018 मध्ये अन्न व औषध प्रशासनाने त्याच्या ऊर्जा आयुर्वेदिक क्लिनिकवर छापा टाकला होता. या छाप्यात बनावट औषधे मिळून आली होती. त्यावेळी विभागाने जप्त केलेली एकूणच औषधे प्रशासनाने तपासली असता ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार आता पंचवटी पोलीस ठाण्यात या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक जीवन जाधव यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात डॉक्टरविरुद्ध तक्रार दिली आह. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित वीरेंद्र गिरासे याने पेठकर प्लाझा येथे ऊर्जा आयुर्वेदिक नावाचे क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकमध्ये त्याने अ‍ॅलोपॅथिक घटकाच्या द्रव्याचे मिश्रण करून त्यापासून बनावट औषधे तयार केली.

त्यानंतर ही बनावट औषधे रुग्णांना व सर्वसामान्य नागरिकांना विकली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका पोहोचेल असे वर्तन केले. या प्रकरणी संशयित डॉक्टरवर पंचवटी पोलीस ठाण्यात औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा कलमान्वये व भारतीय दंड विधान कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे करीत आहेत.