Breaking News

जीवन उध्वस्त करणारे युद्ध नको जगाला बुद्ध हवा - प्रा. चव्हाण

जगाला शांतता व सहिष्णूतेची गरज आहे. धार्मिक विद्वेषानेच आजवर जगावर युद्धं लादली गेली आहेत. सामाजिक समता व शांती याचीच खर्‍या अर्थाने जगाला गरज असून भगवान बुद्धांनीही हाच संदेश जगाला दिला आहे. परंतु सध्याची एकंदर परिस्थिती पाहता जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. अखिल प्राणीमात्राचे जीवन उद्धस्त करणारे युद्ध नको असून जगाला बुद्धाची गरज आहे. असे प्रतिपादन प्रा. किसन चव्हाण यांनी केले.

तालुक्यातील तनपुरवाडी येथील बुद्ध मंदिराच्या प्रांगणात आयोजीत केलेल्या, धम्म वंदना, पूजापाठ व मोहनराव गाडे जीवनगौरव पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमांच्या पार्श्‍वभूमिवर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड होते. यावेळी माजी नगराध्यक्षा रत्नमाला उदमले, जि.प. सदस्य अनिल कराळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बंडू बोरुडे, उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते हुमायून आतार, प्रा. दिगंबर गाडे, पप्पू बोर्डे, वसंत बोर्डे, बाबा राजगुरू, महेंद्र राजगुरू, सुरेश भागवत, नाना पगारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोहनरावजी गाडे जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जी.एस. दादा कांबळे यांना सामाजिक तर अशोक गायकवाड यांना राजकीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषणातून माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी मोहनराव गाडे यांच्या राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या राजकीय व सामाजिक कार्याला अवलंबितांना कालकथित स्वांतत्र्यसेनानी मोहनराव गाडे यांनी कधीही तडजोड केली नाही. भगवान बुद्धांनी घालून दिलेल्या शिकवणीनुसार त्यांनी आपले जीवन व्यतित केले. बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग तत्वांना त्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्षात स्थान देऊन त्या मार्गावरुन ते कधीही ढळले नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिगंबर गाडे यांनी तर, सूत्रसंचालन वसंत बोर्डे यांनी केले, त्याचबरोबर महेंद्र राजगुरू यांनी उपस्थितांचे आभार मानले.