Breaking News

भुजबळांनी घेतली शरद पवार यांची भेट राजकीय तर्क-वितर्कांना उधाण

मुंबई - राज्यातील ओबीसी नेते म्हणून ओळख असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर शुक्रवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत पवार-भुजबळ यांची अर्धा तासाहून जास्त बंद खोलीत चर्चा झाली असल्याने अनेक राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.


कारागृहातून सध्या जामिनावर बाहेर आलेले भुजबळ लगेचच राजकीय क्षेत्रात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे बोलले जात आहे. भुजबळ हे आपल्याला भेटण्यासाठी येणार असल्याचे पवारांना समजल्याने त्यांनी कोकणातील नियोजित कार्यक्रम आणि इतर बैठकाही रद्द केल्या होत्या. त्यामुळे भुजबळ-पवार भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील कार्यक्रमासोबतच ओबीसीची नव्याने ताकद निर्माण करण्यावर चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. तर या भेटीनंतर भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपली भेट ही रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर होणार असल्याचे ठरले होते. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेस अथवा इतर राजकीय विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही तर शरद पवारांनी वडीलकीच्या नात्याने आपल्या प्रकृतीसंदर्भात विचारपूस केली. त्यासाठी विशेष काळजी घ्या, प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका, असेही पवारांनी आपल्याला सांगितले असल्याचे भुजबळ म्हणाले. मला जामीन मिळाला त्यावेळी पहिला फोन हा शरद पवार यांचाच आला होता, अशी माहितीही भुजबळ यांनी दिली. तसेच पडत्या काळात ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला, त्यांचे आभार भुजबळ यांनी मानले होते. दरम्यान, भुजबळ यांनी पवार भेटीसाठी राज्यात सुरू आलेल्या ओबीसी जनगणना अभियानाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला जाण्याचे टाळल्याचे सांगण्यात येते.