Breaking News

सालवडगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता


शेवगाव -  तालुक्यातील सालवडगाव येथे कालभैरवनाथ आनंद आश्रमांमध्ये सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता श्री संत जोग महाराज संस्थानचे मठाधिपती श्रीराम महाराज झिंजुर्के यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. याप्रसंगी त्यांनी ज्ञानोबारायांचा काला या प्रकरणातील अभंग सोडवला. प्रभू रामचंद्राच्या जीवनाचा आदर्श घ्यावयाचा, प्रभू रामचंद्राचे जीवन सर्व प्रकाराने आदर्श होते. कृष्ण अवताराचा फक्त उच्चार करायचा असे सांगून महाराज पुढे म्हणाले, श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीने उचलला, यमुना नदीच्याा डोहातील कालिया सर्पाचा नाश केला. मुखात अग्नि गिळला असे बालपणी अनेक पराक्रम केले. आज तरुणांची पिढी व्यसनाधीन झाल्याने विनाशाकडे चालेली दिसत आहे. मोबाईलमुळे 10 वर्षांनी ही पिढी आंधळी झालेली दिसेल त्यांच्यावर पश्‍चातापाची वेळ येईल. त्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी बालपणीच त्यांच्यावर चांगले संस्कार करणे हीच खरी काळाची गरज आहे. भगवान परमात्मा प्रसाद आपल्या भक्तांना देतो. काला हा वैकुंठात नाही फक्त मृत्युलोकातच काल्याचा प्रसाद मिळतो. यमुना नदीच्या काठावर जो काला भगवान परमात्म्याने केला. तोच काला पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात ज्ञानोबारायांनी केला. तोच काल्याचा प्रसाद आज या ठिकाणी भाविक भक्तांना मिळत आहे. 15 वर्षापासून हभप. सर्जेराव महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह संपन्न होत आहे. याप्रसंगी गायनाचार्य ज्ञानेश्‍वर महाराज लव्हाट, कुंडलिक महाराज लव्हाट, त्रिंबक घाडगे, सोमनाथ वावरे, चंद्रभान कमानदार, जगन्नाथ वाघ, मुरलीधर म्हस्के व पांडुरंग बोडखे, मृदंगाचार्य रामकिसन तापडिया यांच्यासह भाविक भक्त व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. चेअरमन आदिनाथ पाटील लांडे ,हभप अशोक निक्ते, हभप सुनील हाडके यांनी या सप्ताहासाठी विशेष परिश्रम घेतले.