Breaking News

‘चितळी’च्या निवडणूक रिंगणात २६ उमेदवार


राहाता :  चितळी ग्रामपंचायत निवडणुकीत विखे-काळे गटाची आघाडी तर कोल्हे गटाचे स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचपदाच्या दोन उमेदवारांसह सदस्यपदाच्या १० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सरपंचपदासाठी चार तर सदस्यपदासाठी २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

चितळी ग्रामपंचायतीची निवडणुक ही राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जाते. चितळी ग्रामपंचायत ही राहाता तालुक्यात आहे. परंतू विधानसभा मतदारसंघाकरिता ही ग्रामपंचायत कोपरगांव मतदार संघात येते. महसुली कामासाठी राहाता तालुक्यात, चितळी गाव हे पोलीस स्टेशन कामकाजासाठी श्रीरामपूर हद्दीत येते. त्यामुळे राहाता, कोपरगांव आणि श्रीरामपूर या तिन्ही गावांसाठीही ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्वाची समजली जाते. त्यामुळे या निवडणुकीत या ग्रामपंचायतीला विशेष महत्व आहे. तालुक्यावर राजकीय वर्चस्व कायम रहावे, यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि युवानेते सुजय विखे हे या निवडणुकीत लक्ष ठेवून आहेत.

दुसरीकडे कोपरगांव मतदारसंघात चितळी गांव असल्याने युवानेते आशुतोष काळे आणि आ. स्नेहलता कोल्हे यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीमध्ये विखे व काळे यांच्या गटाने आघाडी केल्याने आघाडीचे पारडे जड झाले आहे. राज्य सरकारने सरपंचपदाची निवडणुक ही जनतेतून घेण्याचा निर्णय घेतल्याने सरपंचपदाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तर कोल्हे गटाने स्वतंत्र उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. आघाडी व कोल्हे गटाने प्रत्येक प्रभागात एकास एक उमेदवार दिल्याने याठिकाणी दुरंगी लढत होणार आहे.