Breaking News

भोजापुर धरण उंचीवाढ आंदोलनाची घोषणा नान्नजदुमाला येथील ग्रामस्थांच्या बैठकित एकमताने निर्णय

भोजापुर धरणाची उंची तीन मीटरने वाढविण्यासाठी भोजापुर धरण उंचीवाढ आंदोलनाची घोषणा संगमनेर तालुक्यातील नान्नजदुमाला येथील ज्ञानेश्‍वर माऊलींच्या मंदिरात श्रीफळ वाढवून नुकतीच करण्यात आली. तसेच या आंदोलनात इतर लाभार्थी गावांचा सहभाग मिळून त्यांची मते जानण्याकरिता लवकरच शेतकरी जनसुनावणी घेतली जाणार असल्याची माहिती धर्मा मोकळ यांनी दिली.


नान्नजदुमला येथे झालेल्या ग्रामस्थांच्या सभेत भोजापुर धरण उंचीवाढ आंदोलनाचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी धर्मा मोकळ हे होते. यावेळी एकनाथ झोडगे, सुखदेव चत्तर, नामदेव कडनर, भाऊसाहेब भालेराव, सोपान चत्तर, पुंजाराम लाड, नामदेव गायकवाड, लहानु चत्तर, रवेजा फटांगरे, शिवाजी मोकळ, अनिल गुंजाळ, चांगदेव चत्तर, केशव कडनर आदिंनी आपले विचार मांडून या पंचक्रोशीतील गावांच्या सर्वांगीन विकासासाठी धरणाची उंची वाढविण्याची गरज व्यक्त केली.
अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी सरकारचे सर्व अवाहन व प्रस्ताव वाचून या धरणाची ऊंची वाढू शकणार असल्याची भुमिका मांडली. तसेच हे आंदोलन व्यापक करण्याच्या उद्देशाने धरणाच्या लाभार्थी गावात शेतकरी जनसुनावणी घेतली जाणार असून, यामध्ये ग्रामस्थांचे विचार जाणून घेतले जाणार आहे. यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवून सर्व लाभार्थी ग्रामस्थांना बरोबर घेवून आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असल्याचे सांगितले.
भोजापुर धरणाची उंची तीन मीटरने वाढू शकते असा अहवाल मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग नाशिक यांनी महाराष्ट्र शासनाला सादर केलेला आहे. सदर धरणाची उंची वाढविल्यामुळे सिन्नर तालुक्यातील नव्याने दहा गावे तर संगमनेर तालुक्यातील नान्नजदुमाला, सोनोशी, काकडवाडी, पारेगाव खुर्द, पारेगाव बुद्रुक, तळेगाव दिघे, वडझरी आदि गावांना याचा लाभ होणार आहे. या गावांना निळवंडे धरणाचे किंवा इतर कोणत्याही धरणाचा लाभ मिळत नाही. विशेष म्हणजे या धरणाची उंची वाढविल्यामुळे कोणतेही गाव बुडीत होणार नाही किंवा यापासून धोका नाही. अत्यंत कमी प्रमाणात शेतकर्‍यांचे पुनर्वसन करावे लागणार असल्याचे बैठकित स्पष्ट करण्यात आले. सन 1972-73 ला हे धरण झाले परंतू त्याची क्षमता जाणीवपुर्वक कमी ठेवण्यात आली. पुर्णसंचय पातळीच्यावर म्हणजे 688 मीटर तलंकापर्यंन्त पाणीसाठा होवू शकतो आणि त्यातून आजच्या धरण क्षमतेची पाणी साठवणुक क्षमता किमान दिडपटीने वाढणार असल्याची भुमिका उपस्थितांनी मांडली.