Breaking News

चिरंजीव प्रसाद औरंगाबादचे नवे पोलीस आयुक्त

औरंगाबाद- अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शहराला कायम स्वरुपी पोलीस आयुक्त मिळाले आहेत. नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबादच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात सोमवारी गृहविभागाकडून त्यांच्या नावाचा अध्यादेश काढण्यात आला. कचरा प्रश्‍नावरून शहरातील मिटमिटा परिसरात दंगल झाली. दंगल हाताळण्यात कमी पडल्याचा ठपका ठेवत मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना आयुक्तपदावरून हटवले होते. तत्पूर्वी कचरा टाकण्यास विरोध करणार्या मिटमिटा येथील आंदोलकांवर अमानूष लाठीहल्ला केल्याप्रकरणी राज्य सरकारने त्यांना 15 मार्च रोजी सक्तीच्या रजेवर पाठविले होते. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे आयुक्त पदाचा अतिरीक्त पदभार आहे. त्यांनी अडीच महिन्यात शहराला पूर्वपदावर आणण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, जुन्या औरंगाबादेत वर्चस्ववादावरून पेटलेल्या दंगलीने त्यांच्या प्रयत्नांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे अखेर चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबादचे पूर्णवेळ पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.