Breaking News

अंचलगावच्या सरपंच-उपसरपंचपदी चक्क पतिपत्नी!


कोपरगाव : सरपंचपदी सुनिता शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतमध्ये सरपंच शिंदे यांचे पती उपसरपंच आहेत. गावचा कारभार हे पती-पत्नी पाहत आहेत. 
यापूर्वी गेली २८ वर्षे सरपंचपदाच्या माध्यमातून गावची धुरा सांभाळना-या या कुटुंबाकडे गावचा कारभार आला. सात सदस्य संख्या असलेल्या अंचलगाव ग्रामपंचायतीची सन २०१५ मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली होती. सरपंचपद हे रोटेशन पध्दतीने ठरल्याने प्रथम अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सरला कृष्णा शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. तर उपसरपंचपदी रमेश फकिरा शिंदे यांची निवड झाली. ठरल्याप्रमाणे सरला शिंदे यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या या जागेची सदस्यांअंतर्गत निवडणूक पार पडली. त्यात उर्वरित अडीच वर्षांसाठी पुढील कालावधीसाठी सुनिता रमेश शिंदे यांच्या नावाची सुचना मावळत्या सरपंच सरला शिंदे यांनी मांडली. त्या सूचनेला सर्व सदस्यांनी बिनविरोध पाठिंबा दिला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रवंदा येथील मंडलाधिकारी के. आर. वाघ, येसगावचे तलाठी धनंजय प-हाड, अंचलगावचे ग्रामसेवक बी. के. बागुल यांनी काम पहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सरला शिंदे शकुंतला वाघ, वैशाली ठोंबरे आदी उपस्थित होत्या.