Breaking News

संस्थेच्या दप्तरचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या उपलेखापरिक्षकास मारहाण

कर्जत / प्रतिनिधी ।  तालुक्यातील मिरजगाव येथील सहकारी संस्थेमध्ये उपलेखापरिक्षक म्हणून कार्यरत असणार्‍या माणीक शिवराम सोनटक्के यांना हेंरब गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. मिरजगाव या संस्थेच्या दप्तरचा ताबा घेण्यासाठी गेले असता मारहाण करून जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार कर्जत येथे घडला. 
कर्जत येथील सहकारी संस्थेमध्ये माणीक शिवराम सोनटक्के उपलेखापरिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कार्यालयीन आदेशानुसार दि. 05/01/2016 रोजी हेंरब गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या मिरजगाव या संस्थेच्या दप्तरचा ताबा घेण्याची कामगिरी सोपवली. त्यानुसार सोनटक्के यांनी संस्थेचे माजी चेअरमन राष्टवादीचे जि.प.सदस्य गुलाब रामचंद्र तनपुरे यांना भ्रमनध्वनीद्वारे संपर्क साधुन विषयांकीत संस्थेचा अवसायक म्हणुन निंबधकाच्या आदेशान्वये संस्थेचा दप्तरचा ताबा घेण्यासाठी येत असल्याची कल्पना दिली. तनपुरे यांनी संस्थेचे सचिव बाबासाहेब एकनाथ कंक यांच्याशी संपर्क झाला असून तुम्ही या असा निरोप दिला. त्यानुसार सोनटक्के कारवाई करिता गेले असता एफ आय आर मधून आमची नावे वगळावीत असा दम त्यांना तनपुरे व कंक यांनी दिला. यास विरोध केल्यांनतर या दोघांनी सोनटक्के यांना गाडीत घालून तनपुरे यांचे मंगल कार्यालयात आणले व मारहाण केली. शेजारील तळ्यात बुडवून मारण्याची धमकी दिली.दरम्यान कंक यांनी वैधानिक लेखापरिक्षण अहवालच्या मुळप्रती व इतर आँफिसचे असलेले कागदपत्रे असणारी बॅग काढून घेतली व याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.याबाबत सोनटक्के यांनी कर्जत पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असून तनपुरे, कंक, उमेश देवकर आदींविरुद्ध अपहराचा, संस्था सभासदांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे