Breaking News

मुळा धरण परिसरात अतिविषारी औषध फवारणी?


राहुरी : अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा जलाशयात मासेमारी करत असताना अतिविषारी औषधाची फवारणी होत असल्याचे समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर धरण कार्यक्षेत्रावर सुरक्षितता म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राहुरी पोलिस ठाण्यात मुळा जलाशयातील पाण्यात झालेल्या अतीविषारी औषध फवारणी प्रकरणी गुन्हाही दाखल झाल्याने हे धरण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांच्या ‘निगराणी’खाली आले आहे. सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ होत असल्याने यात नेमके कोण आहेत, याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी क्षमता असलेल्या मुळा जलाशयाचे पाणी अहमदनगर शहर, नगर औद्योगिक वसाहत, बु-हाणनगर व ४४ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, भिंगार कँन्टॉनमेंट, सुपा औद्योगिक वसाहत, राहुरी नगरपरिषद, देवळाली प्रवरा नगरपरिषद, तसेच राहुरी तालुक्यातील १४ गावे त्याचप्रमाणे १८ गाव पाणीपुरवठा योजना, वांबोरी चारी या ठिकाणी असलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद पाईपलाईनद्वारे केला जातो. धरण पाणलोट क्षेत्र साधारणपणे ४५ किलोमीटर अंतरापर्यंत आहे. या संपूर्ण धरण परिसरात सुरक्षिततेसाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, शेवगाव या तालुक्यांच्या कृषी क्षेत्रात शेतीसाठी येथील जलाशयातून पाणी सोडले जाते. मुळा जलाशयात अतिविषारी औषध व जिलेटीनचा स्फोट घडवून मासेमारी केली जात असल्याचा गंभीर प्रकारही उघडकीस आला होता. या जलाशयातील पाणी यामुळे दूषित होत असल्यामुळे हा प्रकार नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणारा व जलाशयातील अन्य जलचर प्राणी यांच्याही जीवाला धोका पोहचविणारा हा गंभीर प्रकार समोर येत आला. त्यामुळे जिल्हाप्रशासनाने याची गांभीर्याने दखल यापूर्वीच का घेतली नाही, पाटबंधारे विभाग व मत्स्य विभाग यांचे येथे दूर्लक्ष का झाले, अधिकारी वर्ग झोपी गेला होता का, हे आणि असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 

यासंदर्भात विविध वृत्रपत्रांमधून वाचा फुटल्यांनतर प्रशासन कुंभकर्णी झोपेतून उशिरा जागे झाले. त्यानंतर प्रशासन गुन्हा दाखल करण्यास सरसावले. मात्र या प्रकाराची सखोल चौकशी होऊन यात केवळ छोटे मासेच अडकले, की मोठेही मासे यात आहेत, हे अद्याप तरी गुलदस्तात आहे. परंतु, ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ हे सारे होऊन संबधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी अपेक्षा सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. 

बडे ‘मासे’ अडकणार का? 
मुळा जलाशयात अतिविषारी औषध फवारणी करुन मासेमारी होत असल्याप्रकरणी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या गंभीर प्रकाराचा तपास वरिष्ठ दर्जाच्या पोलिस अधिका-याने करणे गरजेचे असताना याचा तपास पोलिस कॉन्सटेबल दर्जाच्या कर्मचाऱ्याकडे सोपविला गेला. प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहत आहे, हे यातून समोर आले आहे. यात बडे मासे पोलिस प्रशासनाच्या गळाला खरेच अडकणार का, हे पाहणे यातून औत्सुक्याचे ठरणार आहे. 

सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा 
मुळा जलाशयाची सुरक्षा आजही रामभरोसे असून येथे केवळ दोन बंदूकधारी पोलिस आणि अन्य दोन पोलिस असे चार पोलिस कर्मचारी तैनात आहेत. मात्र प्रत्यक्षात येथे दोनच बंदूकधारी पोलिस कर्मचारी तैनात असल्याचे दिसून आले आहे. येथील एकूण २६ सीसीटीव्ही कँमेऱयांपैकी केवळ दोनच कँमेरे चालू आहेत. त्यापैकी एक धरणाच्या ११ दरवाजाकडील व एक भिंतीच्या खालील बाजूकडील पॉवर हाऊस येथील कँमेरा चालू आहे. उर्वरित कँमेरे दुरुस्तीअभावी बंद आहेत.