Breaking News

१ हजार ९९१ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क


संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील घारगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ८८. ८८ टक्के मतदान झाले. ३ हजार ३३१ लोकसंख्येच्या या गावातील २ हजार २४० मतदारांपैंकी १ हजार ९९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणूकीत सरपंचपदासाठी चार तर सदस्यपदासाठी ११ उमेदवार रिंगणात होते. प्रभाग दोनमधील जया गाडेकर व प्रभाग चारमधील रुपाली कान्होरे यापूर्वीच बिनविरोध घोषित झाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्धन आहेर यांच्याविरुध्द काँग्रेसपक्षाचे अंतर्गत दोन गट असल्याने या रंगतदार लढतीत गेल्या १० ते १५ वर्षांतील दांडगा लोकसंपर्क, राजकीय अनुभव व काँग्रेसमधील अंतर्गत गट यामुळे जनार्धन आहेर यांचे पारडे जड राहिले. सरपंचपदासाठी अर्चना नितीन आहेर व डॉ. प्रिया राहुल आहेर या दोन उमेदवारांमध्ये चुरस असल्याने यावेळीही सरपंचपदाची माळ आहेरांच्याच गळ्यात पडणार, हे नक्की आहे.

मतदानाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडून गालबोट लागू नये यासाठी, प्रशासन सज्ज होते. घारगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली दोन उपनिरीक्षक व सोळा पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. शिवाय उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी प्रत्यक्ष मतदानस्थळी भेट देवून पहाणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण अरगडे यांनी काम पाहिले. उद्या {दि. २८} सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात होणाऱ्या मतमोजणीनंतर सरपंचपदाचे भवितव्य ठरणार आहे.

अशी आहे रचना 

या निवडणुकीत प्रभाग एकमध्ये २६४ पुरुष, २३७ महिला असे एकूण ५०१, प्रभाग दोन मध्ये ३१३ पुरुष, २६८ महिला असे ५८१, प्रभाग तीन मध्ये २५० पुरुष व 238 महिला असे ४८८ तर प्रभाग चार साठी २३६ पुरुष, १८५ महिला असे ४२१ मतदान झाले.