Breaking News

‘जनविकास’ आणि ‘जगदंबा’मध्येच लढत


राहुरी विशेष प्रतिनिधी : तालुक्यात ११ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल {दि. २७} किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. ब्राम्हणी येथे जनविकास आघाडी आणि जगदंबा जनविकास मंडळ या दोन मंडळांमध्ये सरळसरळ लढत पहायला मिळाली. 
तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीत ८७ टक्के मतदान झाल्याची आकडवारी समोर आली आहे. यामध्ये ब्राम्हणी ग्रामपंचायत- ८६ %, म्हैसगाव- ८८ %, दरडगाव- ८७ %, धामोरी बु.- ९०%, धामोरी खु.- ९४ %, मोमिन आखाडा- ९६ %, घोरपडवाडी- ९१ %, देसवंडी- ९१ %, तमनर आखाडा- ९५ %, बारागाव नांदूर- ८२ % अशी मतांची आकडेवारी आहे. दरम्यान, आज {दि. २८ } मतमोजणी होणार असून दुपारपर्यंत निकाल हाती येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार अनिल दौंडे यांनी दिली.

नंगी तलवार आणि पळापळ 
तालुक्यातील ब्राम्हणी येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु असतांना एका उमेदवाराच्या भावाला काही विरोधी लोकांनी अज्ञात कारणावरुन मारहाण केली. एका पैलवान मुलाला ही घटना समजली. घटनास्थळी नंगी तलवार दाखवित दहशत पसरवली. यामुळे नागरिकांची काहीवेळ पळपळ झाली. पोलिसांनी या तरुणास ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. जगदंबा मंडळाच्या एका कार्यकर्त्याच्या वडिलांना मारहाण झाल्यामुळे चिडलेल्या पैहलवान मुलाने नंगी तलवार घेवुन विरोधकावर धावत जावुन दहशत पसरवल्याची घटना घडल्याने काही काळ ग्रामस्थामधे पळापळ झाली होती.