Breaking News

पंतप्रधान आवास योजनेची प्रक्रिया 18 जूनपासून सुरु


सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे स्वतःचे घर असावे या दृष्टीने डिसेंबर 2015 मध्ये पंतप्रधान आवास योजनेची घोषणा केली आहे. सन 2022 पर्यंत या योजनेची पूर्तता केली जाणार आहे. सांगोला नगरपालिकेस पंतप्रधान आवास योजनेचे 1606 घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पंतप्रधान आवास योजनेचा नगरपालिका हद्दीतील नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी 18 ते 30 जूनपर्यंत अर्ज विक्री व स्वीकारणे प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी या पूर्वी नगरपालिकेकडे साध्या अर्जाद्वारे नोंदणी केली आहे अशा नागरिकांनी व इतर नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेच्या नियम व अटी पूर्ण करून फॉर्म भरावेत. सर्वांसाठी फॉर्म फी 100 रुपये ठेवण्यात आली आहे. तरी नागरिकांनी 18 ते 30 जून या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत नगरपालिकेत सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या स्वतंत्र विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्षा राणीताई माने यांनी शहरवासीयांसाठी केले आहे. पंतप्रधान आवास योजनेची चार घटकामध्ये विभागणी केली आहे. यामध्ये झोपडीपट्टी पुनर्विकास करणे यामध्ये फक्त झोपडपट्टीधारकांनाच लाभ घेता येणार आहे. सदरचा झोपडपट्टीधारक हा 1 जाने 2000 पूर्वीचा तेथील रहिवाशी असावा. व्याज अनुदान या घटकांमध्ये 6 लाखापर्यंतचे 6.50 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्याज अनुदान या घटकात परवडणार्‍या घरांची निर्मिती करण्याचे ध्येय असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कर्जसलग्न व्याज अनुदान योजना आहे. खासगी भागीदारीद्वारे परवडणार्‍या घरांची निर्मिती करणे या घटकांमध्ये बेघर व्यक्तींना तसेच घर नसणार्‍या व्यक्तींना लाभ घेता येईल. यामध्ये 30 चौ.मी. क्षेत्रफळाचे घर देण्यात येणार असून 2.50 लाखाचे अनुदान देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना स्वतःच्या मालकीच्या जागेवर घर बांधण्यासाठी 2.50 लाख अनुदान मिळणार आहे. सांगोला नगरपालिका हद्दीतील जे नागरिक पंतप्रधान आवास योजनेसाठीचे निकष पूर्ण करू शकतील त्यांनी 18 ते 30 जून या कालावधीत संपर्क साधावा, असे माने यांनी सांगितले.