Breaking News

क्रोएशियाचा नायजेरियावर 2-0 ने दिमाखदार विजय


मास्को/वृत्तसंस्था : 
फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेत शनिवारी मध्यरात्री क्रोएशियाने आपल्या पहिल्याच सामन्यात नायजेरियाचा 2-0 ने पराभव केला आहे. या सामन्यात नायजेरियाचा खेळाडू ओघेनेकारो इटेबो याने मोठी चूक केली. त्याने सामन्यात 32 व्या मिनिटाला एक स्वयंगोल केला. त्यानंतर क्रोएशियाने पेनल्टी गोल मारून या स्पर्धेतील पहिल्या विजयाला गवसनी घातली. फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेतील आठव्या सामन्यात क्रोएशियाच्या मांडझोकारोने मारलेला हेडर डिफ्लेक्ट होऊन इटेबोच्या पायाला लागला. दरम्यान नायजेरियाचा गोलकिपर ओझोहो याला काही कळण्यापूर्वी क्रोएशियाचा गोल झाला होता. त्यानंतर 70 व्या मिनिटाला नायजेरियाचा ट्रूस्ट इकाँग याने प्रतिस्पर्धी खेळाडूला खाली पाडल्याने रेफ्रीने पेनल्टी दिली. त्यावर क्रोएशियाचा कर्णधार मॉड्रिकने मारलेल्या गोलमुळे क्रोएशियाने फिफा विश्‍वचषकाच्या पहिल्या सामन्यात नायजेरियावर विजय मिळवला. 
दोन्हीही संघ चांगले आहेत, परंतु क्रोएशियाची बाजू थोडी जास्त वरचढ मानली जात होती. 1998 च्या आपल्या पहिल्याच फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेत सेमीफाईनलमध्ये धडक मारलेला क्रोएशियाचा संघ 21 व्या विश्‍वचषक स्पर्धेत चांगली टक्कर देऊ शकतो. क्रोएशियाची सर्वात मोठी ताकद म्हणजे मिडफील्ड आणि फॉरवर्डवर राहणारे स्टार खेळाडू होय. या संघाचे अनेक खेळाडू हे स्पॅनिश क्लब रियल मद्रिद आणि बार्सिलोना सारख्या मोठ्या क्लबशी जोडले गेले आहेत.