Breaking News

अनधिकृत लॉजवर खुलेआम देहविक्रय; व्यवसाय प्रशासनाकडून डोळेझाक


अकोले / ता. प्रतिनिधी 
शहरातील एका अनधिकृत लॉजवर खुलेआमपणे वेश्या व्यवसाय सुरू आहे. अडगळीच्या ठिकाणी असलेल्या या लॉजवर कॉलेजच्या तरुण तरुणींचा मुक्त संचार दिसत आहे. या लॉजवर प्रशासन कारवाई करताना अजिबात ही धजत नाही. या लॉजवर पोलिसांनी रात्री अपरात्री छापा टाकल्यास त्या लॉजचा खरा चेहरा समोर आल्याशिवाय राहणार नाही.
अकोले शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाने केवळ तीनच लॉजना अधिकृत परवाना दिला होता. यापैकी एका लॉजच्या परवाण्यावर अनेकदा तक्रारी नोंदविण्यात आल्याने प्रशासनाने तो लॉज बंद केला आहे. लॉज मालकाने देखील सदर लॉज परत सुरू करण्याची धडपड न करता थेट त्या लॉजला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अकोले शहरात अधिकृत परवाना धारक दोनच लॉज आहेत. प्रवाशी व नागरिकांची कमी दरात राहण्याची सोय उपलब्ध व्हावी व स्थानिकांना जागेच्या मोबदल्यात रोजगार मिळावा या उदात्त हेतूने शासनाने लॉज सुरू केले आहेत. मात्र लॉज धारकांनी शासनाच्या या उपक्रमाला केराची टोपली दाखविली आहे. याउलट लॉजमध्ये प्रवाशी व नागरिकांची वर्दळ कमी दिसत असून कॉलेज तरुण तरुणी यांचीच वर्दळ अधिक दिसून येत आहे. प्रेमयुगुल किंवा धंदेवाईक महिला व पुरुषांकडून एका तासाच्या मोबदल्यात हजार दोन हजार रुपये भेटत असल्याने लॉज धारकांचे पाच ही बोटे तुपात बुडाली आहेत. मात्र प्रशासनाने केलेल्या जाणीवपूर्वक डोळेझाकीमुळे हे गंभीर प्रकार वाढले आहेत. अकोले शहरातील एका लॉज धारकाने तर सर्वच मर्यादा पायदळी तुडवल्या आहेत. पैशाच्या अति हव्यासापोटी या लॉज मालकाने परप्रांतीय महिलाच लॉजवर काही खास नागरिकांच्या खिदमतीसाठी आणून ठेवल्या आहेत. आता महाविद्यालये सुरू झाली आहेत. लॉजवर प्रवेश देताना दोघांचे ही ओळखपत्र आणि घरचा पत्ता व मोबाईल नंबर घेणे अनिवार्य आहे. मात्र काही वेळातच हजारो रुपये मिळतात. त्यामुळे लॉज मालक या बारा भानगडी करण्याच्या नादात अजिबातच पडत नाही. या लॉजमुळे नवीन पिढीचे पुढील आयुष्य धोक्यात आले आहे. सर्व विभागाच्या अधिकार्‍यांशी आपले संबंध दृढ आहेत, असे भासवून लॉज मालक अशाप्रकारचे अवैधधंदे सुरू आहेत. स्थानिक प्रशासन या लॉजबाबत तोंडावर बोट ठेऊन गप्प बसले आहे. त्यामुळे नगरच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या लॉजकडे लक्ष घालण्याची नितांत गरज आहे. या लॉजमुळे तरुण-तरुणी वाममार्गाला जात असून, अनेक जणांचे प्रपंच धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या लॉजवर कधीही छापा पडल्यास पोलीस प्रशासनाच्या हाती नक्कीच धागेदोरे लागतील, यात तीळमात्र ही शंका नाही.

आपल्या लॉजवर येणार्‍या तरुण तरुणांची बदनामी होणार नाही, याची पूर्व काळजी लॉज मालकाने चांगलीच घेतली आहे. लॉजच्या बाहेर असणार्‍या रस्त्याला आडोसा म्हणून एक जाळीदार नेट बांधली आहे. त्यामुळे या लॉजमध्ये कोण येतेय, आणि कोण जातेय याचा काहीच थांगपत्ता स्थानिक नागरिकांना लागत नाही. या लॉजच्या काळ्या कारनाम्याची चर्चा संपूर्ण अकोले तालुक्यात रंगू लागली आहे. या लॉजची प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास नक्कीच एखादा अनुचित प्रकार घडेल, यात काहीच शंका नाही.