Breaking News

शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात

कर्जत / प्रतिनिधी । शहरासह तालुका परिसरामध्ये रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी हिन्दू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत ऐक्याचे दर्शन ईदगाह मैदांनामध्ये घडविले.


शनिवार दि. 16 रोजी कर्जत शहर आणि तालुक्यात मोठ्या आनंदाने रमजान ईद (ईद उल फ़ित्र) मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कर्जत शहरातील सर्व मुस्लिम बांधव जामा मस्जिद येथे एकत्र येत, ईदगाह मैदानमध्ये नमाज अदा करण्यासाठी एकत्र जमले होते. यावेळी जामा मस्जिदचे इमाम मौलाना अखलाक अहमद यांनी ईद उल फ़ित्रची नमाज अदा करत खुदबा पठन केले. यावेळी बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. नमाज अदा केल्यानंतर महसुल प्रशासन,पोलिस प्रशासन आणि सामाजिक व् सर्व राजकीय पक्षीय पदाधिकार्यानी मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. विश्‍व-शांतीसाठी दुवा झाल्यानंतर मुस्लिम बांधवानी एकमेकांना आलिंगन देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 

मशीद बांधकामसाठी हिंदू बांधवाचे सहकार्य
कर्जत शहरातील आलमगीर मस्जिदचे बांधकाम सुरू आहे. यावेळी ईदगाह मैदानात शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हिंदू बांधवांनी सदरच्या मस्जिद बांधकामाकरीता आर्थिक मदत देत उपस्थित असणार्‍यांना हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले.

ईदला शिरखुर्माच का?
मुस्लिम बांधव एक महिना रोजे ठेवतात आणि त्याच्या आनंद ईदच्या दिवशी शिरखुर्मा करून साजरा करतात. या दिवशी शिरखुर्माच का? तर पुर्वी खजुर हे सौदी अरेबियाचे मुख्य पीक होते. तिथे ते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे सगळ्यांना ते घेणे शक्य व्हायचे. यामुळेच दुध म्हणजेच शिर आणि खुर्मा म्हणजेच खजुर या दोघांच्या मिश्रणातुन शिरखुर्मा तयार झाला. काळानुसार आवड आणि खाद्य संस्कृतीत झालेल्या बदलामुळे आता शिरखुर्मामध्ये सुकामेवा, शेवया, बदाम, काजु, शारोळे, मनुके व खारीक हे पदार्थही आवडीनुसार समाविष्ट केले जातात. मात्र मूळ शिरखुर्मा म्हणजे खजुर आणि दुध यांचेच मिश्रण होय.