Breaking News

अकोले न्यायालयाने सुनावली दोघा जणांना शिक्षा

येथील न्यायालयाचे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एस.पी. सय्यद यांनी दोन खटले निकाली काढले असून दोघा जणांना शिक्षा सुनावली आहे.अकोले पोलीस ठाण्यात केशव गोंदके या बस वाहकाच्या फिर्यादीवरून पांडुरंग खोकले या इसमावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा, भारतीय दंड संहिता कलम 353, 332 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणावर गेली अनेक वर्षे न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेर न्यायाधीश एस.पी सय्यद यांनी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुरावे तपासून पांडुरंग खोकले या इसमास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फिर्यादी पक्षकाराच्या वतीने अकोले न्यायालयाच्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता अर्चना शिंदे यांनी काम पाहिले. दुसर्‍या घटनेत देखील न्यायाधीश एस पी सय्यद यांनी आरोपीला शिक्षा सुनावली आहे. अकोले पोलीस ठाण्यात संजय दातखिळे यांच्या फिर्यादीवरून भाऊसाहेब घोलप या आरोपीवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील सर्व साक्षीदार व पुरावे तपासून न्यायाधीश सय्यद यांनी आरोपी भाऊसाहेब घोलप यास शिक्षा सुनावली आहे. 15 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दीड महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच फिर्यादीस आरोपीने 5 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश ही न्यायालयाने दिला आहे. गत 15 दिवसांच्या कालखंडात न्यायाधीश एस.पी सय्यद व सहाय्यक सरकारी अभियोक्ता अर्चना शिंदे यांनी अनेक प्रकरणे निकाली काढून आरोपींना शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल विशाल हासे, आनंद मैड यांनी काम पाहिले.